मान्यवरांसह नागरिक,मुले, मुली झाले सर्वच भावनाविवश
एरंडोल:- आई-वडील ज्यांच्या घरात आहेत, ते जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. कारण मुलांच्या आयुष्यात आई देवी, तर बाप देव असतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी केले. आमदार अमोल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे आयोजित ‘आई-बाप समजून घेतांना’ या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून हंकारे बोलत होते. व्याख्यानादरम्यान आमदार पाटील व उपस्थित मान्यवरांसह सर्वच भावनाविवश झाले होते.
येथील काबरे विद्यालयाच्या पटांगणावर शिवसेना व आमदार अमोल पाटील मित्र परिवारातर्फे हे व्याख्यान झाले. यावेळी हंकारे म्हणाले की, मुलांच्या गरजा भागविण्यासाठी वडील दिवसभर कष्ट करतात. वडील स्वतः फाटके कपडे घालतात मात्र, मुलांना नवीन कपडे घेण्यासाठी काबाडकष्ट करतात. मुलीच्या विवाहानंतर वडील सर्वांसमोर हसत असतात. मात्र, रात्री एकांतात रडून अश्रुंना वाट मोकळी करून देतात. एकांतात रडणारे वडील कोणालाच दिसत नाहीत. मुलांना जन्म देताना आई मरणयातना सहन करते. मुलांना जन्म देताना आईचा पुनर्जन्म होत असतो, त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात आईवडिलांना महत्वाचे स्थान आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर आईवडील स्वतःसाठी न जगता मुलांसाठी जगतात. ज्यांना वडील नसतात, त्यांनाच वडिलांची किमत कळत असते. आईवडिलांच्या निधनानंतर भिंतीवरील फोटो मुलांना मिठी मारू शकत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत आईवडील जीवंत आहेत, तोपर्यंत मुलांनी त्यांच्यावर प्रेम करावे, असे आवाहन हंकारे यांनी केले.
आमदार अमोलदादा पाटील यांचेसह यांची प्रमुख उपस्थिती
आमदार अमोल पाटील व पारोळ्याच्या माजी नगराध्यक्षा नलिनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. हंकारे यांचे व्याख्यान सुरू असताना उपस्थित महिला, पुरुष, विद्यार्थी-विद्यार्थिनी भावनाविवश झाल्या होत्या. राकेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आमदार पाटील यांचे आगमन होताच विद्यार्थ्यांनी जल्लोष करून त्यांचे स्वागत केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, शहरप्रमुख बबलू चौधरी, तालुका संघटक संभाजी पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी सभापती अनिल महाजन, प्रभाकर पाटील, बापू पाटील, माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र पाटील, जगदीश ठाकूर, कुणाल महाजन, परेश बिर्ला, मयूर महाजन, कृष्णा ओतारी, बबलू पाटील, माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे, मृणाल पाटील, सरला पाटील, पारोळ्याच्या माजी उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, बाजार समितीचे संचालक किरण पाटील, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.