चहापत्तीत डांबराचा रंग; तपासणी होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
पिंपरी – अनेकांचा दिवस चहाने सुरू होतो. चहा हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी चहाला अमृततुल्य म्हटले जाते. मात्र हैदराबाद येथे चहामध्ये डांबराचा रंग मिसळल्याचे समोर आले आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्येही चहा पावडरमध्ये भेसळीचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर चहापत्तीत भेसळ होत असल्याचा दावा विक्रेते करत आहेत. त्यामुळे तुम्ही पित असलेला चहा सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपल्या संस्कृतीमध्ये आजही आदरतिथ्य करण्यासाठी चहालाच प्राधान्य दिले जाते. ग्रामीण भागात अजूनही एकमेकांकडे चहा पिण्यासाठी बोलवण्याची पद्धत आहे. बाजारामध्ये मिळणाऱ्या सुट्या चहा पावडरमध्ये भेसळ केली जात असल्याचे समोर आले आहे. पाकिटबंद चहा पावडर ही सुट्या चहापेक्षा महाग असते. तेलंगणा राज्यातील हैदराबादमध्ये चक्क डांबराचा रंग लावलेली चहा पावडर बाजारात सापडली असल्याने खळबळ उडाली आहे. इतर राज्यांतील मोठ्या शहरामध्ये देखील भेसळयुक्त चहा विक्री होत असल्याचा दावा तेथील चहा विक्रेत्यांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन महिन्यांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने चहापत्तीच्या दुकानावर कारवाई केली होती. यावेळी दोन सॅम्पल घेण्यात आले होते. त्यामध्ये रंग भेसळ करत असल्याचे निष्पण झाले होते. त्यामुळे विक्रेत्याला तीस हजार रुपये दंड केला होता.
–अर्जुन भुजबळ, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे.
–
चहामधील भेसळ कशी ओळखायची?
तुम्ही पित असलेल्या चहामध्ये भेसळ आहे की नाही हे तुम्ही घरबसल्याही ओळखू शकता. त्यासाठी एक फिल्टर पेपर घ्यावा. चहाची पावडर त्या फिल्टर पेपरवर पसरवून ठेवावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे, जेणेकरून फिल्टर पेपर ओला होईल. त्यानंतर फिल्टर पेपर पाण्यात धुवावा. त्यामुळे चहाची पावडर निघेल आणि चहा पावडरमध्ये भेसळ असेल तर तुम्हाला फिल्टर पेपरवर डाग दिसतील. चहाची पावडर खराब असल्यास फिल्टर पेपरचा रंग तपकिरी किंवा काळा होतो. तसेच त्यामध्ये डांबर मिसळलेले असेल तर कागदावर गडद काळे डाग दिसतात.
बाजारात निम्म्या किमतीमध्येच मिळते चहा पावडर
पाकिटबंद चहा पावडर प्रतिकिलो 400 ते 500 रुपयांला मिळते. नामांकित कंपनीची चहा पावडर यापेक्षाही महाग विकली जाते. मात्र, रस्त्यावरील चहाची दुकाने व हातगाड्यांवर स्वस्तातील चहा पावडर वापरली जाते. तसेच बाजारामध्ये देखील 150 ते 200 रुपये प्रतिकिलो याप्रमाणे चहा पावडर मिळते. पाकिटबंद चहापत्ती व सुट्टी मिळणाऱ्या चहापत्तीच्या किमंतीमध्ये मोठी तफावत आहे.