व्हॅलेंटाइन डेच्या दोन दिवस आधी सुटली एकमेकाची साथ.
कबड्डी खेळता खेळता …प्रेमाचे सुत जुळले… एकमेकांना वचन देत आणाभाका घेतल्या अन जीवन भर सोबत जगण्याचा निर्धार केला…पण नियतीला काही औरच मान्य होते …अर्ध्यावरती डाव मोडीला …अधुरी एक प्रेम कहाणी
अमळनेर :- तालुक्यातील लोंढवे येथील विनोद सुरेश पाटील हा उत्कृष्ट कबड्डी खेळाडू होता. अनेक ठिकाणी स्पर्धांना येणे जाणे होते. कारले येथील पूनम हिच्याशी ओळख झाली. दोघेही राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू असल्याने विचारांचे सुत जुळले. मैत्री झाली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २०१७ मध्ये दोघांनी जीवनभर साथ देण्याच्या आणाभाका, वचन विवाहाच्या बंधनात रुपांतरीत झाले. विनोद शेती करूनही त्यांचा संसार सुखाने चालू होता.
पूनम विनोद पाटील वय २७ ही सायंकाळी नळाला पाणी आले म्हणून मोटर लावून पाणी भरत होती. तिचे पती विनोद सुरेश पाटील घरात माठात पाणी भरत होते. अचानक काही तरी पडल्याचा आवाज आला म्हणून पती विनोद पाटील पळत आले तेव्हा त्यांना त्यांची पत्नी पूनम खाली बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. तिच्या हातात विजेची पिन होती. तिला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. लग्नाच्या आठ वर्षांनी दोघांचा डाव अर्ध्यावरती मोडला प्रेम सप्ताहातील “वचन दिवशी” प्रेमी युगुलाच्या वचनाचा भंग झाला. नियतीने पुनमला विनोदपासून हिरावून नेले. घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण गावाने हळहळ व्यक्त केली.
विनोद पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.