VIDEO : मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्न मंडपात घोड्यावर बसलेला असतानाच नवरदेवाचा अचानक मृत्यू झाला. यानंतर लग्नातील आनंदाचं रूपांतर शोकात झालं. वधू आणि वराचे नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सायलेंट हार्ट अटॅकने नवरदेवाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे.
मध्य प्रदेशातील श्योपूर शहरातील पाली रोडवरील जाट हॉस्टेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लग्न समारंभात गेल्या शुक्रवारी रात्री ही दुःखद घटना घडली. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि लग्नाची वरात मोठ्या थाटामाटात लग्नस्थळी पोहोचली. नवरदेव प्रदीप जाट घोड्यावर स्वार होऊन आनंदाने स्टेजकडे जात होता. याच दरम्यान, त्याची तब्येत अचानक बिघडली. सुरुवातीला काय झालं आहे हे कोणालाही समजलं नाही, परंतु जेव्हा नवरदेवाचा तोल गेला तेव्हा लग्न मंडपात गोंधळ उडाला.नवरदेवाला घाईघाईत घोड्यावरून खाली उतरवण्यात आलं आणि ताबडतोब जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी प्रदीपला मृत घोषित केलं. डॉक्टरांच्या मते, सायलेंट हार्ट अटॅक हे त्याच्या मृत्यूचं कारण असू शकतं परंतु खरं कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच उघड होईल.
या घटनेमुळे लग्नातील आनंदी वातावरण शोकात बदललं. सर्वांना मोठा धक्का बसला. वधू-वरांच्या कुटुंबीयांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. प्रदीपच्या ओळखीच्या लोकांना आणि नातेवाईकांना त्याच्या निधनाने धक्का बसला आहे. याआधी देखील अशा काही घटना घडल्या आहेत. सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.