मृत्यूआधी मैत्रिणीला मेसेज पाठवून, इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने 15व्या मजल्यावरून उडी घेत संपविले जीवन;धक्कादायक कारण आले समोर.

Spread the love

पुणे :- पिंपरी परिसरातील एका नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.याप्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली होती. पण पीडित मुलीने जीवन संपवण्याआधी मैत्रिणीला पाठवलेल्या एका मेसेजमुळे तिच्या आत्महत्येचं कारण समोर आले आहे.

सहिती रेड्डी (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. ती इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिने 5 जानेवारीला सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला होता. तसेच आकस्मीक मृत्यूची नोंद केली होती. पण, आता वर्गमित्राने दिलेल्या त्रासातून युवतीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

प्रणव राजेंद्र डोंगरे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी युवकाचे नाव आहे. त्याचे मागील काही दिवसांपासून सहितीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. याच प्रेमाचा फायदा घेऊन प्रणवने पीडितेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. या त्रासातून तिने 5 जानेवारीला 15 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. पण मृत्यूआधी तिने आपल्या मैत्रिणीला एक मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये तिने मोबाईलचा पासवर्ड आणि सोसायटीत राहणाऱ्या काही मित्रांचे नंबर पाठवले होते.याबाबत मैत्रिणीने सहितीच्या कुटुंबियांना सांगितले असता कुटुंबीयांनी सहितीचा मोबाईल फोन अनलॉक केला. त्यामध्ये सहितीने मित्र प्रणव, आई-वडील आणि सर्वांसाठी असे तीन व्हॉइस रेकॉर्डिंग आढळून आले. यात तिने आरोपी प्रणवच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले. याप्रकरणी सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी (वय 54, रा. ताथवडे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रणव राजेंद्र डोंगरे (वय 20, रा. आकुर्डी) याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी