
एरंडोल :- शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेवून घरी मुक्ताईनगर येथे जात असलेल्या शिक्षक परिवाराच्या कारला कंटेनर मागच्या बाजूने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती व तीन मुळे गंभीर जखमी झाले.हा अपघात आज मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास पिंपळकोठा गावाजवळील हॉटेल युपी जवळ झाला. याबाबत माहिती अशी,की मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील हे पत्नी रुपाली पाटील (वय-४०) आणि तीन मुलांसह कार क्रमांक एम.एच.१९ सी.क्यू. ७००९ ने शिर्डी येथे साईबाबा यांच्या दर्शनासाठी गेले होते.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते मुक्ताईनगर येथे जात असतांना
पिंपळकोठा गावाजवळ असलेल्या हॉटेल युपी जवळ त्यांच्या कारला मागून येणा-या कंटेनर क्रमांक डब्लू बी २३ एफ ९४७२ ने जोरदार धडक दिल्यामुळे कार डिव्हायडरवर धडकली.या अपघातात कार मधील रुपाली पाटील यांचेसह पती राजेश पाटील, मुले ख़ुशी,स्वरा आणि गुरु गंभीर जखमी झाले.अपघात झाल्यानंतर
महामार्गावरून जाणा-या प्रवाशांनी तसेच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेवून जखमींना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात व खासगी दवाखान्यात दाखल केले.
यामध्ये रुपाली पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता तर तीनही मुले गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर कल्पना हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याबाबत राजेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार काशिनाथ पाटील तपास करीत आहेत.शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेवून परतणा-या कुटुंबावर रस्त्यावरच घाला घालून पतीसमोरच पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ
व्यक्त करण्यात येत आहे.