अमरावती :- पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः पतीनेसुद्धा आत्महत्या करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमोल सुरेशराव गायकवाड (वय-३५), आणि शिल्पा अमोल गायकवाड (वय-३२) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.ही घटना रहाटगाव येथील प्रज्ज्वल पात्रे यांच्या शेतात घडली.
अधिक माहितीनुसार, मूळचे धामणगाव तालुक्यातील वाठोडा आणि सध्या रहाटगाव येथील रहिवासी अमोल गायकवाड आणि रामगाव येथील शिल्पा गायकवाड यांचा ७ महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. कल्पदीप मंगल कार्यालय मागे असलेल्या जिल्हा पुरवठा कार्यालयातील पुरवठा निरिक्षक प्रज्वल विठ्ठलराव पात्रे यांच्या शेतात अमोलचे वडील रखवालदारी आणि मजुरी करत होते. त्याठिकाणी असलेल्या दुमजली फार्म हाऊसमध्ये अमोल आणि शिल्पा तसेच अमोलचे वडील सुद्धा वास्तव्यास होते.
दोन दिवसांपूर्वी अमोलचे वडील बाहेरगावी गेले होते आणि रविवारी सकाळी परत आल्यानंतर त्यांनी मुलगा आणि सुनेला आवाज दिला. मात्र, त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने अमोलच्या वडिलांनी खोलीत जाऊन बघितले असता खोलीत पलंगावर शिल्पाचा मृतदेह दिसला तर अमोलचा मृतदेह फासावर अडकलेला आढळला. या घटनेची नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र अंभोरे यांना माहिती मिळताच ते आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला यावेळी पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त सागर पाटील, फ्रेजरपुरा विभागाचे एसीपी कैलास पुंडकर हे घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शिल्पा आणि अमोलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. अमोलने शिल्पाची हत्या का केली असावी? स्वतः गळफास का घेतला? की अजून काही घातपात झाला याबाबत सर्वच बाजूने पोलीस तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पीएसआय कवडे करीत आहेत.