विराटचा संयमी खेळ, हार्दिकचा आक्रमक खेळ, राहुलच्या विजयी षटकार लावून,भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्याअंतिम फेरीत प्रवेश.

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने दमदार खेळी करत ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली. विराट कोहलीच्या संयमी आणि कौशल्यपूर्ण खेळीमुळे भारताने २६५ धावांचे लक्ष्य सहज पार केले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ४९.३ षटकांत सर्वबाद २६४ धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत कांगारू संघाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४८.१ षटकांत २६७/६ धावा करून विजय संपादन केला.

विराटचा संयमी खेळ आणि हार्दिकचा आक्रमक शेवट

विराट कोहलीने ९८ चेंडूत ८४ धावा करत भारतीय डावाची सूत्रे हाती घेतली. श्रेयस अय्यर (४५), अक्षर पटेल (२७) आणि के. एल. राहुल (४२*) यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. शेवटच्या क्षणी हार्दिक पांड्याने ३ उत्तुंग षटकार मारत (२८ धावा, २४ चेंडू) सामना भारताच्या बाजूने झुकवला. विराटला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन एलिसने २/४९ आणि अॅडम झॅम्पाने ६०/२ अशी गोलंदाजी करत भारताच्या फलंदाजांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय फलंदाजांनी संयम राखत लक्ष्य पूर्ण केले.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा “शेवटच्या चेंडूपर्यंत सामना अनिश्चित होता, पण आमच्या खेळाडूंनी योग्य निर्णय घेत विजय मिळवला. अंतिम फेरीसाठी आता मानसिक आणि शारीरिकरित्या सज्ज होण्याचा आमचा प्रयत्न असेल. “ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ “गोलंदाजांनी मेहनत घेतली, पण आम्ही काही धावा कमी केल्या. खेळपट्टीवर धावा करणे सोपे नव्हते. मात्र, आमच्या संघाने उत्तम लढत दिली.”

भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील इतिहास:-

भारताने २०००, २००२, २०१३, २०१७ आणि आता २०२५ असा पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत भारताची लढत न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिका संघातल्या विजेत्या संघाविरुद्ध होणार आहे.

अंतिम फेरीकडे नजर:-

भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे अंतिम फेरीबाबत उत्सुकता वाढली आहे. ५ मार्चला होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यानंतर भारताच्या प्रतिस्पर्ध्याचा निर्णय होईल. आता भारतीय संघ अंतिम फेरीत कोणता पराक्रम गाजवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी