लग्नासाठी तगादा लावणाऱ्या गर्लफ्रेंडची दोन महिन्यांपूर्वी केली हत्या, दृश्यम स्टाईलने पुरावे केलेत नष्ट, मृतदेह अन् आरोपी शोधताना पोलिसांना फुटला घाम.

Spread the love

वसई :- लग्नासाठी तगादा लावत असल्याने बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडची दृश्यम स्टाईल हत्या केली आहे. 25 वर्षांची तरुणी बॉयफ्रेंडकडे वारंवार लग्नाचा आग्रह करत होती, यातून आरोपीने डिसेंबर 2024 साली प्रेयसीची हत्या केली.गुन्हे शाखा-3 च्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावत मयत तरुणीचा प्रियकर अमित सिंग याला बेड्या ठोकल्या आहेत.

वसईच्या गिरीज येथे राहणाऱ्या अमित सिंग (वय 28) या तरुणाचे उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये राहणाऱ्या प्रिया सिंग (वय 25) या तरुणीसोबत प्रेमसंबध होते. अमित याच्या मालकीच्या वसईत दोन बेकऱ्या आहेत, तर प्रिया ही उच्चशिक्षित होती.

25 डिसेंबरपासून प्रिया बेपत्ता

25 डिसेंबर 2024 पासून प्रिया ही बेपत्ता होती, तिच्या कुटुंबियांनी तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार उत्तर प्रदेशच्या स्थानिक पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर पोलिसांना प्रियाचा मोबाईल दिल्लीमध्ये आढळला होता, पण तिचा काहीच शोध लागत नव्हता, त्यामुळे प्रियाच्या बेपत्ता होण्याचे गूढ वाढले होते. पोलिसांनी अमित सिंग याच्याकडे दोन वेळा चौकशीही केली, पण प्रियाला दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आपण बसवले, असं तो वारंवार सांगत होता.गोरखपूर जिल्ह्याच्या एम्म पोलीस टाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवांशू सिंग यांनी दिल्लीत तपास केल्यानंतर प्रियाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन वसई निघाले. यानंतर त्यांनी बुधवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मदत मागितली. गुन्हे शाखा-3 च्या पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शाहूराज रणावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी तपास सुरू केला.

प्रियकर अमित सिंग याने 25 डिसेंबरलाच प्रियाची हत्या करून तिचा मृतदेह वसई पूर्वेच्या पोमाण गावाजवळील निर्जन जागेत फेकून दिला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून कुजलेल्या अवस्थेमधील मृतदेह हस्तगत केला आणि अमित सिंगला अटक केली.

पुरावा नष्ट करण्यासाठी दृश्यम स्टाईल

अमित सिंग याने प्रियाची गळा दाबून हत्या केली. यानंतर त्याने गाजलेल्या दृश्यम सिनेमाची युक्ती वापरली, त्याने प्रियाचा मोबाईल दिल्लीत जाणाऱ्या ट्रेनमध्ये टाकला, त्यामुळे पोलिसांची दिशाभूल झाली आणि पोलीस दिल्लीत तपास करत राहिले.याबाबत माहिती देताना गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले की, प्रिया आणि अमित यांचे मागील दीड ते दोन वर्षांपासून प्रेमसंबध होते. प्रिया लग्नाचा तगादा लावत असल्याने अमितने तिचा काटा काढण्याचे ठरवले, त्याने तिला वसईमध्ये नाताळ बघण्यासाठी बोलावले होते, त्यानंतर त्याने प्रियाची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह पोमण गावाच्या झुडुपात फेकून दिला. गुन्हे शाखा-3 च्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी