कोल्हापूर :- अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. त्यानंतर प्रियकर व त्याच्या साथीदारांनी मृतदेह स्मशानभूमीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे उघडकीस आला.
संजय अल्लाबक्ष शिकलगार (वय ३८, मूळ रा. यादवनगर जयसिंगपूर, सध्या रा. लक्ष्मीनगर धरणगुत्ती) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हल्लेखोराने त्याच्या डोके व मानेवर कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला २७ फेब्रुवारी रोजी लिंगायत स्मशानभूमीजवळ रात्री घडला. त्यानंतर मृतदेह तेथील लिंगायत समाज स्मशानभूमीत पुरण्यात आला होता.शिरोळ पोलिसांनी याप्रकरणी चौघा संशयितांना अटक करीत खुनाचा उलगडा केला.
त्यानंतर सायंकाळी संशयिताना घटनास्थळी घेऊन पुरलेला मृतदेह बाहेर काढला. या खूनप्रकरणी पत्नी दीपा संजय शिकलगार (३५ रा. लक्ष्मीनगर धरणगुत्ती), प्रियकर दर्शन भगवान कांबळे (३६), त्याचा भाऊ अमृत भगवान कांबळे व त्याचा काका स्वागत वियज कांबळे (तिघे रा. धरणगुत्ती ता. शिरोळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम शिरोळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.याबाबत शिरोळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी : संजय शिकलगार दीड वर्षांपासून गोव्यात गवंडी काम करीत होते. ते २६ फेब्रुवारीला गोव्यावरून गावी आले. गेल्या काही दिवसांपासून पत्नी दीपा व दर्शन यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. अनैतिक संबंधात पतीचा अडसर येत असल्याने पत्नी व प्रियकर यांनी त्यांचा काटा काढण्याचे ठरविले. त्याप्रमाणे २७ फेब्रुवारीला रात्री संजय शिकलगार यांना घरातून पत्नी दीपा शिकलगार, तिचा प्रियकर दर्शन कांबळे व त्याचा भाऊ व चुलता यांनी त्याला धरणगुत्ती येथील माळभागावर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या परिसरातील लिंगायत स्मशानभूमीजवळ आणले.
स्मशानभूमीच्या परिसरात कोयत्याने संजय यांच्या डोक्यात आणि मानेवर सपासप अनेक वार करून खून करण्यात आला. दरम्यान, शिरोळ पोलिस ठाण्यात संजय शिकलगार २७ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याची फिर्याद मंगळवारी (ता. ४ मार्च) रोजी अनिल शिकलगार यांनी दिली. संजय शिकलगार यांच्या नातेवाइकांनी बेपत्ता घटनेबाबत सखोल चौकशी करावी, तसेच यामध्ये खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता.यानंतर शिरोळ पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकांनी तपास गतिमान केला. यामध्ये पत्नी दीपा, प्रियकर दर्शन कांबळे यांच्यावर संशय आला. यामुळे पत्नी, प्रियकर त्याचा भाऊ व चुलत्याला ताब्यात घेतले आणि त्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे शिरोळ तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. मृत संजय यांच्या मागे तीन मुलगे, आई, भाऊ असा परिवार आहे.
मृतदेह स्मशानभूमीत पुरला
शिरोळ ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड व कर्मचाऱ्यांनी प्रियकर कांबळे याला धरणगुत्तीमधील लिंगायत स्मशानभूमीत नेले. तेथे मृतदेह पुरलेल्या जागा शोधली. त्यानंतर तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या उपस्थितीच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तो भाग मृतदेह बाहेर काढला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. शिरोळ ग्रामीण रुग्णालयाच्या पथकाने घटनास्थळीच शवविच्छेदन केले. यानंतर या घटनेत सहभागी असलेल्या चौघांना शिरोळ पोलिसांनी रात्री अटक केली आहे.