सेलम :- (तामिळनाडू) – जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका व्यक्तीने त्याच्या दोन प्रेयसींसोबत मिळून तिसऱ्या प्रेयसीची हत्या केली आहे. लोगानायागी असे 35 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे.आरोपीला मृत महिलेसोबतचे आपले नाते संपवायचे होते. त्यामुळे त्याने आपल्या दोन्ही प्रेयसींसोबत मिळून महिलेला विषारी इंजेक्शन देऊन तिला खोल खड्ड्यात फेकून दिले. तसेच आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र तामिळनाडू पोलिसांनी फसवणूक आणि हत्येचा एक गुन्हा उघडकीस आणला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत लोगानायागी ही एका खाजगी कोचिंग सेंटरमध्ये काम करायची आणि वसतिगृहात राहत होती. ती 1 मार्चपासून बेपत्ता होती. पोलिसांकडे लोगानायागी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली. याप्रकरणी तपासाला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी लोगानायागी हिच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासले. यावेळी त्यांच्या लक्षात आले की, लोगानायागी हिने 22 वर्षीय आरोपी अब्दुल अबीज याच्याशी संवाद साधला होता. त्यामुळे पोलिसांनी अब्दुल अबीज याची चौकशी केली असता त्यांना समजले की, लोगानायागीचे अब्दुलशी प्रेमसंबंध होते आणि ती त्याला भेटण्यासाठी येरकॉडला गेली होती.
पोलिसांनी अब्दुलची चौकशी केली असता त्यांना समजले की, आरोपीचे थाविया सुलताना आणि मोनिशा या दोन तरुणींसोबत सुद्धा प्रेमसंबंध होते. थाविया सुलताना ही आयटी कर्मचारी आहे, तर मोनिशा ही नर्सिंगची विद्यार्थिनी आहे. अब्दुलला लोगानायागी सोबतचे त्यांचे संबंध संपवायचे होते. मात्र लोगानायागी ही प्रेमसंबंध संपवायला तयार नव्हती. एवढेच नाहीतर तिने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आणि तिचे नाव बदलून अल्बिया ठेवण्याचा देखील निर्णय घेतला होता. मात्र आरोपी अब्दुलला हे मान्य नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या दोन्ही प्रेयसींसोबत मिळून लोगानायागीला मारण्याचा कट रचला.
पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींनी चर्चेच्या बहाण्याने लोगानायागीला येरकॉड येथे भेटायला बोलावले. यावेळी त्यांनी लोगानायागीला विषारी इंजेक्शन दिले आणि तिला बेशुद्ध केले. यानंतर आरोपीनी लोगानायागीला 30 फूट खोल खड्ड्यात फेकून दिले. लोगानायागीने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी अब्दुल अबीज, थाविया सुलताना आणि मोनिशा यांना अटक केली आहे. लोगानायागीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.