बेळगाव :- प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर चाकूने हल्ला करून तिचा खून केला आणि स्वतःवरही चाकूने वार करून घेऊन जीवन संपवल्याची खळबळजनक घटना खासबाग सर्कलजवळील घरात मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेत मृत युवती ऐश्वर्या लोहार (वय १९, रा. नवी गल्ली, शहापूर) असे असून, प्रियकर प्रशांत कुंडेकर (२९, रा. येळ्ळूर) असे त्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांसह पोलिस आयुक्त व उपायुक्तांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली.पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत आणि ऐश्वर्या यांचे दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. प्रशांत हा लग्न करून घेण्यासाठी इच्छुक होता. त्यामुळे तिच्या आईकडे लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, तिच्या आईने ‘चांगले काम करून चांगली कमाई कर, त्यानंतरच लग्न लावून देऊ,’ असे सांगितले होते.
मंगळवारी प्रशांत ऐश्वर्याच्या खासबाग सर्कल जवळील मावशीच्या घरी आला होता. तेथे दोघांची भेट झाली होती. यावेळी लग्नावरून दोघांमध्ये वादावादी झाल्याचा संशय आहे. लग्न करण्यास नकार दिल्याच्या कारणातून दोघांमध्ये वादावादी होऊन ही घटना घडल्याचे समजते. प्रशांतने ऐश्वर्यावर चाकूने हल्ला केला आहे, तिच्या गळ्यावर, पोटावर आदी ठिकाणी चाकूचे वार करण्यात आले आहेत. तर स्वतःही प्रशांतने चाकूने आपल्या गळ्यावर वार करून घेऊन स्वतःला संपवले. प्रशांत हा व्यवसायाने फरशी बसविण्याचे काम करत होता, अशी माहिती पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनी दिली.घरामध्ये कोणीच नसताना ही घटना घडल्याने सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेची माहिती कोणालाच झाली नव्हती. घरातील सदस्य सायंकाळी घरी परतल्यानंतर ऐश्वर्या व प्रशांत या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. कुटुंबियांनी घटनेची माहिती शहापूर पोलिसांना दिली. या घटनेने धक्का बसलेल्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाला पाठविण्यात आले.
विषाची कुपीही आढळली
या भीषण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विषाची कुपीही तेथे आढळून आली आहे. त्यामुळे विष घेतले की नाही, हे उत्तरीय तपासणी केल्यानंतरच उलगडा होणार आहे. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास सुरू आहे. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे यांनीदेखील घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.