आठ वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून

Spread the love

पिंपरी -दगडाने ठेचून आठ वर्षांच्या मुलाचा खून करण्यात आला. ही घटना चिखली येथे रविवारी (दि. 17) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या गुन्ह्यातील आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास समाजबांधवांनी नकार दिला. चिखली पोलीस ठाण्यासमोर शेकडो नागरिक रात्री उशिरापर्यंत बसून होते. यामुळे 24 तासानंतरही त्या मुलावर अंत्यसंस्कार झालेले नव्हते.

लक्ष्मण देवासी (वय 8, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्‍त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण देवासी हा मुलगा रविवारी दुपारपासून बेपत्ता होता. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास लक्ष्मण याचा मृतदेह एका पडक्‍या पत्र्याच्या शेडमध्ये आढळून आला. दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली.

लक्ष्मण हा तो मूळचा राजस्थानचा आहे. त्यास चार बहिणी असून तो एकुलता एक मुलगा होता. लक्ष्मण याच्या खुनाची माहिती मिळताच समाजबांधव नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. जोपर्यंत आरोपीला शोधून अटक करणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर समाज बांधवांनी आपला मोर्चा चिखली पोलीस ठाण्याकडे वळविला. त्यांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात न घेता चिखली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या माडंला. दरम्यान पोलीस तीन दिशेने तपास करीत आहेत. मुलाला लैंगिक त्रास देण्यासाठी कोणीतरी पडक्‍या शेडमध्ये नेले असावे आणि विरोध केल्याने त्याचा खून केला असावा. दुसरी शक्‍यता म्हणजे लक्ष्मण याच्या कुटुंबीयांकडून कोणी दुखावले गेले असावे आणि त्या रागातून लक्ष्मणचा खून केला असावा. तिसरी शक्‍यता म्हणजे कोणाच्यातरी अनैतिक संबंधाबाबत लक्ष्मणला माहिती मिळाली असावी आणि तो ती माहिती इतरांना सांगेल, या भीतीने त्याचा खून केला असावा. या तीनही शक्‍यतांबाबत पोलीस तपास करीत आहेत.

गुन्हे शाखेची तपासाकडे पाठ
लहान मुलाच्या खुनाची घटना घडली असून, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र शहरातील गुन्हे शाखेची पथके या तपासात सोमवारी दिसून आली नाही. याबाबत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्‍त केली.

टीम झुंजार