पुणे :- गौरव अहुजा या माथेफिरू तरूणानं नशेत केलेलं अश्लील कृत्याची घटना ताजी असतानाच आणखी एका तरूणाच्या कृत्यामुळे पुणेकर संतापले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आईनं नशा करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एका २७ वर्षीय तरूणानं सोसायटीतील रहिवाशांच्या १३ दुचाकी पेटवून दिल्या आहेत. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रहिवाशांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पिंपरी चिंचवडमधील मोरया क्षितिज बिल्डिंगमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. माथेफिरू नशेखोर स्वप्नील सांगवीनं सोसायटीतील १३ दुचाकी पेटवून दिल्या. आई नशा करण्यासाठी पैसे देत नसल्यामुळे त्यानं हे भयानक कृत्य केल्याचं समोर आलं. यासंदर्भात त्याच्या आईनं पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. ‘माझा मुलगा उच्चशिक्षित आहे. मात्र, तो व्यसनाच्या आहारी गेला आहे.
नशेच्या आहारी गेल्यामुळे त्यानं हे कृत्य केलंय. पैसे नाही दिले तर, तो कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देतो.त्याच्यामुळे माझा नवरा गेलाय, माझं घरदार गेलं आहे. पोलिसांना मी विनंती करते, माझ्या मुलाला प्लीज सोडू नका. आज त्यानं सोसायटीतील दुचाकी पेटवल्या आहेत. उद्या तो सोसायटी देखील पेटवू शकतो. तो दुसऱ्यांना देखील धमकी देतो. पोलिसांनी कृपया माझ्या मुलाला सोडू नका’, असं आरोपीच्या आईनं पोलिसांकडे विनंती केली आहे.