संतापजनक!19 वर्षीय नराधम तरुणाने विवाहित महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी,नकार देताच कटरने केले 15 वार 280 टाके टाकून,गोधडीवानी शिवले पीडितेचे अंग.

Spread the love

छत्रपती संभाजीनगर :- पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

भावकीतील एका 19 वर्षीय नराधमाने 36 वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली, तिने नकार दिल्याने तिच्यावरती नराधमाने कटरने वार केला.त्यामुळे तिला तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. या भयंकर वेदना सहन करत पीडित महिला एका खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.स्वारगेट प्रकरणानंतर घडलेल्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाबाबत पिडीतेने अशी माहिती दिली की, गेल्या अनेक दिवसांपासून नराधम हा माझा पाठलाग करत होता. त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं होतं. मात्र रविवारी संध्याकाळी मी शेतातील काम संपवून पांदीच्या रस्त्याने एकटीच जात असताना अचानक त्यांने माझी वेणी ओढली आणि डोकं दगडावर आपटलं. त्यानंतर मला काही समजण्या आधीच त्याने कटरने माझ्या तोंडावर वार केला.त्यानंतर मी ओरडायचा प्रयत्न केला तर त्याने माझ्या गळ्यावरच वार केला यामध्ये माझे कपडे देखील फाटून गेले. त्यानंतर त्याने मोठा दगड उचलून माझ्या अंगावर मारला आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. काही वेळाने मी एक डोळा उघडायचा प्रयत्न केला पण अंगभर सुरू झालेल्या ठणकामुळे डोळ्यातून पाण्याची धार लागली होती. ज्यावेळी शुद्धीत आले त्यावेळी डोळा उघडत नव्हता थोड्या वेळाने लक्षात आले की दोन्ही हातात सलाई लावलेलं होतं, अशी माहिती त्यांनी दिली.

या घटनेतील पीडितेने याबाबत असे सांगितले की, माझ्या अंगावर तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. यासाठी लागणाऱ्या दोऱ्याचा खर्चच 22 हजार इतका आला आहे..मानेपासून ते कमरेपर्यंत सव्वा दोन फुटाचा एक वार आहे. शरीरावर अशी एकही जागा नाही की तेथे वार केलेला नाही. घरातील परिस्थिती जेमतेम आहे सासर प्रमाणेच माहेरची परिस्थिती सुद्धा हलाखीची आहे. उपचार करण्यासाठी पैसे पैसे देखील नाहीत. या घटनेने परिसरात हळवळ व्यक्त केली जात आहे.

चेहऱ्यावर, मानेवर, पाठीवर, छातीवर आणि मांडीवर गंभीर वार

आरोपी हा महिलेच्या ओळखीचा आहे. त्याच्या शेताच्या येण्या जाण्याच्या रस्त्यातच महिलेचे शेत आहे. महिलेला फोन करून तो धमकी देऊन, तो लगट करण्याचा प्रयत्न करत होता. अखेर महिलेला एकटीला गाठून अचानक पाठीमागून येऊन त्याने वेणी खेचली आणि डोकं दगडावर आपटलं. काही समजण्या आधी त्याने महिलेवर कटरच्या साह्याने चेहऱ्यावर, मानेवर, पाठीवर, छातीवर आणि मांडीवर असे गंभीर स्वरूपाचे घाव केले आणि तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच महिला एकटी असल्याचा फायदा घेऊन अत्याचार करण्याचा देखील प्रयत्न केल. महिला ही आता ICU मध्ये असून तिची प्रकृती स्थिर आहे.

शेतात लपून बसला

विवाहिता मृत झाल्याचे समजून अभिषेक निघून गेला. सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाल्याचे कळताच तो गाव परिसरातील शेतात लपून बसला होता. अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपअधीक्षक पूजा नांगरे यांनी तत्काळ कारवाईच्या सूचना केल्या. निरीक्षक रविकिरण दरवडे, उपनिरीक्षक सतीश पंडित यांनी शोध घेत त्याला शेतातून अटक केली. अभिषेक बारावी नापास आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बाहेरून भोळा, आतून विकृत

बारावी नापास अभिषेक शेतीचे काम करतो. गावात कायम देवभक्त, भोळेपणाचा आव आणणाऱ्या अभिषेकचा खरा चेहरा समोर आल्याने त्याच्या गावकऱ्यांसह समाजाच्या सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी शिवेसेनेच्या महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे अभिषेकवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले. अशा घटना समाजासाठी लज्जास्पद आहेत. अशा क्रूरकर्म्याला भरचौकात फासावर लटकवा, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

पॉक्सो कलम वाढवणार

पंधरा दिवसांपूर्वी त्याने गावातील एका घरासमोर खेळणाऱ्या बालकाचे मोबाइलमध्ये फोटो काढले होते. बालकाने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर संतप्त कुटुंबाने त्याला चांगलेच सुनावले होते. त्याच्या कुटुंबालादेखील ही बाब कळाली होती. मात्र, तरीही त्याच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. तपास पथकाने त्याचा मोबाइल जप्त करून सायबर पोलिस व फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून पंचासमक्ष तपासण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्यावर बाललैंगिक अत्याचाराचे (पॉक्सो) कलम वाढवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

रक्ताचे कपडे जाळले

महिलेवर अमानवीरीत्या हल्यात अभिषेकच्या कपड्यांना रक्त लागले हाेते. घराच्याच मागे त्याने ते कपडे पाळा पाचोळा टाकून जाळून टाकले. चिकलठाणा पोलिसांनी कपड्यांची राख, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी गुरुवारी जप्त केली.आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याला तीन दिवसाचे पोलीस कस्टडी मिळाली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी