कोल्हापूर :- मॉलमध्ये खरेदीसाठी येऊन चोरी करणाऱ्यादांपत्याला पोलिसांनी अटक केली. परवेज दिलावर शिलेदार (वय ४५) आणि करिष्मा परवेज शिलेदार (४०, रा. रेसिडेन्सी कॉलनी, शास्त्रीनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. साने गुरुजी वसाहत परिसरातील एका लोकल मार्टमधील व्यवस्थापक केतन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अधिक तपास करून पोलिसांनी दोघांना अटक केली. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.पोलिसांनी सांगितले की, साने गुरुजी वसाहत येथे एक लोकल मार्ट आहे. तेथे एक जोडपे सायंकाळी साडेसहा वाजता आले होते. बराच वेळ ते मॉलमध्ये रेंगाळत होते.
त्यामुळे फिर्यादी पाटील यांना शंका आली. त्यांनी मजले येथील मार्टच्या सीसीटीव्ही कंट्रोल रुमला याची माहिती दिली.ऑपरेटर ऋषिकेश कांबळे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. थोड्यावेळाने ऋषिकेश यांनी फिर्यादी पाटील यांना संपर्क करून महिलेने ड्रेसच्या बाजूच्या कप्प्यात साहित्य लपविल्याचे सांगितले.दरम्यान, हे दांपत्य तेथून निघून गेले होते. त्यानंतर फिर्यादी पाटील यांनी तेथील मोजमाप पूर्ण केले. मात्र, त्यामध्ये तेल, ड्रायफ्रूट, सौंदर्य प्रसाधने असे एकूण वीस हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याचे दिसून आले आहे.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या परवेज शिलेदार आणि करिष्मा शिलेदार या पती पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या जोडप्याची चौकशी केली असता, त्यांनी २०२२ सालीही मॉलमधून चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन पाटील यांनी याची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
CCTV फुटेजमुळे उघडकीस आला प्रकार
लोकल मार्टच्या मॅनेजर केतन पाटील यांनी दुकानातील काही महागड्या वस्तू गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेचच जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत मॉलमधील CCTV फुटेज तपासले असता, संशयित जोडप्याची ओळख पटली. फुटेजमध्ये परवेज आणि करिष्मा शिलेदार हे मॉलमध्ये फिरताना दिसले, तसेच त्यांनी कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि अन्य महागड्या गोष्टी लपवून नेल्याचे स्पष्ट झाले.
बंटी-बबलीची चोरी करण्याची पद्धत
तपासादरम्यान पोलिसांना कळले की, ही बंटी-बबली जोडी वेगवेगळ्या दुकानांमध्ये फिरून चोरी करत असे. त्यांची पद्धत अशी होती की, करिष्मा शिलेदार ही दुकानदारांचे लक्ष दुसरीकडे वेधून ठेवायची, तर परवेज शिलेदार वस्तू चोरून आपल्या बॅगमध्ये टाकायचा. त्यांनी याआधीही वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे.