एरंडोलचे तीन माजी नगराध्यक्षांसह प्रमुख पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश, शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार.

Spread the love

एरंडोल :- शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तीन माजीनगराध्यक्ष, पंचायत समितीचे माजी सभापती,यांचेसह प्रमुख पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख,एरंडोल मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणारे प्रमुख उमेदवार यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मुंबई येथे पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण,मंत्री गिरीश महाजन,आमदार मंगेश चव्हाण,महामंत्री विजया चौधरी यांचे उपस्थितीतभाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,माजी तालुकाध्यक्ष एस.आर. पाटील,माजी नगरसेवक सुनील पाटील,जिल्हा सरचिटणीस निलेश परदेशी,पिंटू राजपूत यांचेसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना ठाकरे गट,राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिका-यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे दोन्ही पक्षांनामोठे खिंडार पडले असून त्यांचे अस्तित्व जवळपास संपुष्ठात आले आहे.पंधरा दिवसात तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान पदाधिका-यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाचे राजकीय वर्तुळातून वेगवेगळे अर्थ लावण्यात येत आहेत. एरंडोलचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर,दशरथ महाजन,पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप रोकडे,माजी उपनगराध्यक्ष संजयमहाजन,शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख प्रमोद महाजन,संदीप बोढरे,पांडुरंग महाजन,राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आनंदा चौधरी

एरंडोल विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवून चाळीस हजाराच्या वर मते मिळवणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भगवान महाजन यांनी असंख्य समर्थकांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.यापूर्वी देखील शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे खिंडार पडूनत्यांचे संघटन विस्कळीत झाले आहे.माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. त्यांच्या पत्नी मीना चौधरी देखील माजी नगराध्यक्षा आहेत.किशोर निंबाळकर हे देखील माजी नगराध्यक्ष असून सुमारे वीस वर्ष नगरसेवक होते.

शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावान पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.दशरथ महाजन हे देखील माजी नगराध्यक्ष असून शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख होते.राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवारयांची माजीमंत्री डॉ.सतीश पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख होती.जिल्हा परिषदेच्या कासोदा आडगाव गटावर त्यांचे वर्चस्व आहे.माजी दिलीप रोकडे पंचायत समितीचे माजी सभापती असून त्यांच्या आईने देखील सभापतिपद सांभाळले होते.भगवान महाजन यांनी एरंडोल विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवून चाळीस हजाराच्या वर मते मिळवली होती.आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट,राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्यापदाधिका-यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशास विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिका-यांमुळे पक्षाला किती लाभ होऊ शकतो याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे.प्रवेश केलेल्या प्रमुख पदाधिका-यांनी महाविकासआघाडीत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह भाजप नेतृत्वावर अत्यंत आक्रमक भाषेत तसेच नेत्यांचा एकेरी उल्लेख करून टीका केली होती,मात्र सहा महिन्यातच पदाधिका-यांचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी भाजपचे नेतृत्व मान्य केले आहे.सर्व पदाधिका-यांचा मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेसह मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

मात्र मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्षांच्या अनुपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. स्थानिक भाजपच्या पदाधिका-यांमध्ये असलेल्या अंतर्गतवादामुळे पक्षाचे अनेक निष्ठावान पदाधिकारी अलिप्त राहत असून आगामी काळात पक्ष नेतृत्व पदाधिका-यांमधील मतभेत मिटवण्यात यशस्वी होतील का याकडेसर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी