शेती विषयक समस्येचे निवारण होत नाही सकाळ पासून ‘बसवून ठेवतात हाकलून देतात’ म्हणून वृद्ध शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात घेतलं विष

Spread the love

सोलापूर : महाराष्ट्रात एकीकडे औरंगजेबच्या कबरीवरून वादंग पेटला आहे. नागपूरमध्ये झालेल्या आंदोलनानंतर हिंसाचार उफाळला. नागपूर पेटलं की पेटवलं अशी चर्चा रंगली आहे.पण सोलापूरमध्ये एका वृद्ध शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एका वृद्ध शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सोपान वासुदेव राऊत असं या विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचं नावं आहे.

शेतीविषयक असलेल्या कारणावरून अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच सोपान राऊत यांनी विषारी औषध प्राशन केलं. मागील अनेक दिवसांपासून उतार वयात सोपान राऊत हे जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते. नेहमीप्रमाणे राऊत कार्यालयात आले आणि खाली बसले. त्यानंतर त्यांनी आपल्यासोबत आणलेलं विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.सोपान राऊत यांनी विषारी औषध प्राशन केल्याचं लक्षात येताच कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी सोलापूरच्या शासकीय रुग्णालाय पोलीस चौकीत तक्रार नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बुलढाणा जिल्ह्यातील युवा शेतकरी कैलास नागरे यांचे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच सोलापुरात वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी