झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-विवाहाला केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असतांना नियोजित पंचवीस वर्षाच्या वराचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.वराच्या अचानक मृत्यूमुळे परिवारासह मित्रमंडळीवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
येथील महात्मा फुले पुतळा परिसरातील रहिवासी संजय विठ्ठल महाजन यांचा मोठा मुलगा भावेश संजय महाजन (वय-२५)याचा विवाह २५ एप्रिल रोजी होणार होता.घरातील मोठ्या मुलाचा विवाह असल्यामुळे संजय महाजन व त्यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण होते.विवाहाची तयारी वेगाने सुरु होती. नातेवाईक,मित्रपरिवार आणि समाजबांधव याना लग्नपत्रिकांचे वाटप देखील करण्यात आले होते.
घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असतांना आज सकाळी नियोजित वर भावेश संजय महाजन हा काका ज्ञानेश्वर विठ्ठल महाजन यांच्या घरी गेला आणि तुमची मोटरसायकल द्या मी नाश्ता करायला जात आहे असे सांगून गेला होता.बराच वेळ झाल्यानंतर देखील भावेश मोटरसायकल घेवून न आल्यामुळे ज्ञानेश्वर महाजन यांनी भावेशाच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो अद्याप घरी आला नसल्याचे त्याच्या आई वडिलांनी सांगितले.काही वेळा नंतर भावेशचे भाऊ राकेश आणि मनोज यांनी ज्ञानेश्वर महाजन यांनी मोबाईल करून भावेश हा धरणगाव रस्त्यावरील त्याच्या शेताच्या जवळ असलेल्या सुनील पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडला असून त्याचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे सांगितले.
ज्ञानेश्वर महाजन हे त्यांचे नातेवाईक गजानन माळी यांच्यासह शेतात गेले असता भावेश यास परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने विहिरीबाहेर काढले आणि त्यास ग्रामीण रुग्णालयात नेले असता तो मयात झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.पाच दिवसानंतर मोठ्या मुलाचा विवाह असल्यामुळे संजय महाजन आणि त्यांच्या परिवारातील सदस्य आनंदात होते.विवाहाची पूर्ण तयारी करण्यात आली होती.मात्र नियतीने काही क्षणातच महाजन परिवाराचा आनंद हिसकावून घेतला आणि सर्व परिवाराला दुखा:च्या खाईत लोटून दिले.याबाबत ज्ञानेश्वर विठ्ठल महाजन यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पुढील तपास करीत आहेत.