मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा बत्तीसावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला. दिल्ली कॅपिटल्सने ९ गडी ९.३ षटकं राखून एकतर्फी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पंजाब किंग्जकडून सर्वाधिक धावा जितेश शर्माने ५ चौकारांच्या सहाय्याने ३२ धावा काढल्या. त्याला अक्षर पटेलने पायचीत पकडले. कर्णधार मयंक अगरवालने ४ चौकारांच्या सहाय्याने २४ धावा काढल्या. मुस्तफिझूर रहमानने त्याचा त्रिफाळा उध्वस्त केला.
बाकी रथी महारथी हजेरी लावून परतले. पंजाबचा संघ २०व्या षटकाच्या अखेरीस ११५ धावा करून सर्वबाद झाला. अक्षर पटेलने ४-०-१०-२, खलिद अहमदने ४-०-२१-२, ललित यादवने २-०-११-२, कुलदीप यादवने ४-०-२४-२ आणि मुस्तफिझूर रहमानने ४-०-२८-१ गडी बाद केले.
दिल्ली कॅपिटल्सने जोरदार प्रहार केला. पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं आणि धावा जमा होऊ लागल्या. केवळ ३.३ षटकांत त्यांची ५० धावांची भागीदारी पूर्ण झाली. दिल्ली कॅपिटल्सने केवळ ५ षटकांत ७५ धावा चोपून काढल्या. ७व्या षटकात राहुल चहरने पृथ्वी शॉला बाद केले. त्याने ७ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने २० चेंडूंत ४१ धावा काढल्या. डेव्हिड वॉर्नरने संयमी फलंदाजी करत २६ चेंडूंत आपलं अर्धशतक झळकावलं.
डेव्हिड वॉर्नरने विजयी चौकार मारून दिल्ली कॅपिटल्सला गुणतक्त्यात सहाव्या क्रमांकावर पोहचवले. डेव्हिड वॉर्नरने १० चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ३० चेंडूंत बिनबाद ६० धावा काढल्या. सर्फराझ खानने एका चौकारासह बिनबाद १२ धावा काढल्या. दिल्ली कॅपिटल्सने ११९/१ असा विजय संपादित केला. पंजाबचा संघ आजचा लाजीरवाणा पराभव कधीच विसरू शकणार नाही.
कुलदीप यादवला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने २४ धावांमध्ये २ गडी बाद केले होते.
उद्या मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. मुंबई अजूनदेखील एकही सामना जिंकलेले नाहीत. चेन्नई आपल्या दुसर्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करतील.