प्रियकराला भेटायला गेली प्रेयसी, दोघात झाला वाद, प्रेयसीने घेतली कालव्यात उडी,तिला वाचवायला गेला अन् प्रियकरही कालव्यात बुडाला.

Spread the love

पुणे :- मामाच्या मुलीला सोबत घेऊन गेलेल्या तरुणीनं प्रियकराशी वादानंतर कालव्यात उडी मारली. तिला वाचवण्यासाठी प्रियकरानेही उडी मारली. प्रियकर आणि तरुणी दोघंही बेपत्ता असून तरुणीच्या मामाची मुलगी कालव्याच्या बाजूला बसून होती.भेदरलेल्या अवस्थेत चिमुकली दिसून आली. डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात विठ्ठलवाडी टाकेवाडी जवळ ही घटना घडली. कविता सुनील पारधी आणि पप्पू लक्ष्मण खंडागळे अशी कालव्यात उडी मारलेल्या दोघांची नावे आहेत.कविता पारधी आणि पप्पू खंडागळे यांच्यासोबत कविताच्या मामाची १३ वर्षीय मुलगी दिव्या दुचाकीवरून टाकेवाडीतल्या ठाकर वाडीकडे जात होते.

टाकेवाडी इथल्या डाव्या कालव्याजवळ पोहोचताच कविता आणि पप्पू यांच्यात भांडण झालं. दोघांमधला वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात कविताने कालव्यात उडी मारली. त्यानंतर पप्पू खंडागळे यानं तिला वाचवण्यासाठी उडी मारली. दोघांनाही पोहता येत होतं. त्यामुळे ते बाहेर येतील असं कविताच्या मामाची मुलगी दिव्याला वाटलं. पण बराच वेळ झाला तरी दोघेही न आल्यानं दिव्या घाबरली.घाबरलेली दिव्या जवळच्याच शेडमध्ये बसली. अंधार असल्यानं मदतीला कोणाला बोलवायचं या विवंचनेत ती होती.

सकाळी शेतकरी रामदास चिखले शेतात आले असता तिथं घाबरून बसलेली दिव्या दिसली. तिला कुठून आलीस, इथे कशी वगैरे चौकशी केली असता घडलेला प्रकार तिनं रामदास चिखले यांना सांगितला.रामदास चिखले यांनी गावकऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि गावकरी घटनास्थळी आले. डाव्या कालव्यात सात ते आठ किलोमीटरपर्यंत कविता आणि पप्पू यांचा शोध घेतला पण दोघेही दिसले नाहीत. पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं शोधकार्यात अडथळा येत आहे. पोलिसांनी तहसीलदारांना पत्र देऊन पाणी कमी करण्याची मागणी केलीय. पाणी कमी झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येणार आहे.

पाणी कमी करण्याची सूचना……

डावा कालव्याला 400 क्युसेकने पाणी वाहत असल्याने बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेणे कठीण झाले आहे. यासाठी मंचर पोलिसांनी तहसीलदारांकडे कालव्यातील पाणी कमी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार तहसीलदारांनी डिंभे धरण विभागास पाणी कमी करण्याची सूचना दिल्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.

मुख्य संपादक संजय चौधरी