लातूर :- जिल्ह्यातील एका गावात सुरु असलेल्या बेकायदेशीर मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज फॅक्टरीवर महसूल गुप्तचर संचालनालय (Directorate of Revenue Intelligence – DRI) च्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत तब्बल ११.३६ किलो मेफेड्रोन, प्रयोगशाळेतील अत्याधुनिक उपकरणे आणि साहित्य जप्त करण्यात आले असून, बाजारमूल्य सुमारे १७ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ही फॅक्टरी मुंबईत कार्यरत असलेल्या पोलीस हवालदारप्रमोद केंद्रे शेतात चालवल होता. याप्रकरणी DRI ने पोलिस हवालदारासह सात जणांना अटक केली आहे.
कारवाई कशी उघडकीस आली?…..
DRI च्या मुंबई विभागाला अंमली पदार्थ प्रकरणात तपास करताना माहिती मिळाली की, मुंबईत वितरित होणाऱ्या मेफेड्रोनचा स्त्रोत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात असू शकतो. या आधारावर गुप्त माहिती संकलित करून, DRI च्या मुंबई व पुणे युनिट्सने संयुक्तपणे कारवाईची रूपरेषा आखली.सदर पथकाने लातूर जिल्ह्यातील रोहिना गावातील एका शेतावर छापा टाकला. येथे पत्र्याच्या शेडमध्ये पूर्णपणे सुसज्ज अशी ड्रग्स फॅक्टरी आढळली. तपासाअंती स्पष्ट झाले की ही जमीन प्रमोद केंद्रे या पोलीस हवालदाराच्या नावावर आहे, जो नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण विभागात कार्यरत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय रजेवर होता.
छाप्यात खालील गोष्टी जप्त करण्यात आल्या:…..
११.३६ किलो मेफेड्रोन (सिंथेटिक ड्रग, अत्यंत व्यसनाधीन) रासायनिक प्रक्रिया करणारे प्रयोगशाळेतील उपकरणे फॉर्म्युले, केमिकल्स आणि साठवणूक साहित्यड्रग्स पॅकिंगसाठी आवश्यक प्लास्टिक पाउचेस व स्केल्सहे सर्व साहित्य अत्यंत व्यावसायिक पद्धतीने वापरात आणले जात होते, जे पाहून ही फॅक्टरी फार काळ चालू असल्याचा DRI ला संशय आहे.
आरोपींचा पळून जाण्याचा प्रयत्न…..
प्रमोद केंद्रेला अटक करून लातूरकडे आणले जात असताना, त्याने कारमध्ये बसलेला असताना अचानक चालकावर हल्ला केला व कारचे स्टेअरिंग जबरदस्तीने फिरवून अपघात घडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार समोरील एका हॉटेलजवळ उभी असलेल्या दुचाकीवर आदळली. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही, परंतु महसूल गुप्तचर संचालनालयाचे काही अधिकारी किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर चाकूर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ड्रग्ज नेटवर्कचा मुंबईपर्यंत विस्तार…..
तपासात उघड झालेल्या माहितीप्रमाणे, लातूर जिल्ह्यातील या फॅक्टरीत तयार होणारे ड्रग्ज मुंबई, मिरारोड आणि वसई-विरार परिसरात वितरित केले जात होते.तपासाअंती हटकेश भागातून ‘मुद्दू’ नावाच्या वितरकाला ताब्यात घेण्यात आले. या नेटवर्कमध्ये आणखी लोकांचा सहभाग असल्याची शक्यता असून, DRI आणि पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा देखील यात सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत कठोर कारवाईसदर गुन्ह्यातील सातही आरोपींना नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा (NDPS Act), 1985 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या कायद्यानुसार अंमली पदार्थांचे उत्पादन, बाळगणे, विक्री व सेवन यावर कडक बंदी आहे. दोष सिद्ध झाल्यास १० ते २० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि लाखो रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
नशा मुक्त भारताच्या दिशेने DRI ची वाटचाल…..
DRI ही संस्था देशात ड्रग्स व बेकायदेशीर व्यापार यांच्याविरोधात सातत्याने मोहीम राबवत आहे. या कारवाईतून ‘नशा मुक्त भारत’ या केंद्र सरकारच्या संकल्पनेला बळकटी मिळते आहे.सदर प्रकरणात आणखी आरोपी, आर्थिक लाभार्थी, आणि पुरवठा साखळीचा तपास लवकरच पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येणार आहे.देशातल्या कायदा रक्षकांनीच जर कायदा मोडायला सुरुवात केली, तर समाजात गुन्हेगारीला खतपाणी मिळते. पण महसूल गुप्तचर संचालनालयाच्या या धाडसी कारवाईमुळे एक मोठे ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त झाले असून, पोलीस खात्यातील असामाजिक प्रवृत्तीवर आघात झाला आहे. हा प्रकरण केवळ कायदाच नाही, तर व्यवस्थेच्या नैतिकतेचा देखील गंभीर प्रश्न उभा करत आहे.