गोवंशाच्या कातडीची वाहतूक करणारे वाहन एरंडोल गोरक्षकांनी पकडले: ट्रकसह कातडी जप्त. तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल.

Spread the love

एरंडोल :- गोवंशाच्या कातडीची बेकायदेशीर वाहतूक करणा-या वाहनास मध्यरात्रीच्या सुमारास पकडून पोलीस स्थानकात जमा केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.सदर ट्रकमध्ये गोवंशाची कातडी असल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांनी ट्रकसह जनावरांची कातडी असा सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करून तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला.याबाबत माहिती अशी,की काल मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गोरक्षक विजय प्रकाश देशमुख व त्यांच्या सहका-यांना कासोदा नाका येथे ट्रक क्रमांक एमएच १९ झेड ९९०९ मधून दुर्गंधी येत असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांनी चालकास ट्रक थांबवण्याचे सांगितले.

विजय देशमुख व त्यांच्या सहका-यांनी ट्रकमध्ये पाहिले असता त्याना त्यामध्ये जनावरांचे कातडे असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांनी ट्रक पोलीस स्थानकात आणला.ट्रक चालक मोहम्मद नदीम अब्दुल करीम व त्याचा सहकारी मोहम्मद समीर मोहम्मद सादिक शेख दोन्ही रा.मालेगाव यांचेकडे जनावरांच्या कातडीबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरची कातडी कासोदा येथील शेख शहजाद शेख नईम यांची असल्याचे सांगितले.सदर कातडे गोवंशाची असल्याचे त्याने सांगितले.चालकाकडे कातडी वाहतुकीबाबत परवान्याबाबतची कोणतीही कागदपत्र आढळून आली नाही.ट्रक पकडताच शेख शहजाद शेख नईम हा पळून गेला.

पोलिसांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पंचांसमक्ष पंचनामा करून कातडीचे नमुने घेवून ते तपासणीसाठी घेतले.याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गबाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेहजाद शेख नईम,मोहम्मद नदीम अब्दुल करीम,मोहम्मद समीर मोहम्मद सादिक शेख या तीन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल केला असून आठ लाख रुपये किमतीचा ट्रक व दोन लाख रुपये किमतीचे कातडे जप्त केले आहे.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार विलास पाटील तपास करीत आहेत.दरम्यान सदरचे कातडे कोठून आणले,गोवंशाची कत्तल कोणत्या ठिकाणी करण्यात आली याबाबत सखोल चौकशी करून दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी गोरक्षकांकडून केली जात आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी