धरणगाव तालुक्यात वडिलांच्या खुनाचा राग मनात धरून सिनेस्टाईल पाठलाग करून कपाळाच्या मधोमध गोळी झाडून केली हत्या.

Spread the love

संशयित आरोपीस धरणगाव न्यायालयाने सुनावली दोन दिवसाची पोलिस कोठडी

जळगाव :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारींच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.अशातच आता जळगावच्या धरणगाव तालुक्यातील सोनवद गावाजवळील विहीर फाटा परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका तरुणाने आपल्या वडिलांच्या खुनाचा राग मनात धरून एका व्यक्तीची गोळी घालून हत्या केली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.गोपाळ सोमा मालचे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. राहुल कोळी असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?…..

जळगावातील धरणगाव तालुक्यातील विहीर फाट्याजवळ मंगळवारी रात्री सिनेस्टाईल पाठलाग करून एका ४० वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आरोपी राहुल ज्ञानेश्वर कोळी हा आरोपी स्वत:हून धरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. यानंतर त्याने पोलिसांना घटनेची सर्व माहिती दिली.

गोपाळ मालचे हे त्यांच्या वाहनाने जात असताना वाकटुकी फाट्याजवळ राहुल कोळी याने त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी डोक्यात गोळी लागल्याने गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला. राहुल कोळीने त्याच्याकडील गावठी पिस्तुलातून चार राऊंड फायर केले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ मालचे याने २०१० मध्ये राहुल कोळीचे वडील ज्ञानेश्वर कोळी यांचा खून केला होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी राहुल कोळीने गोपाळ मालचे यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला.

वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी…..

गेल्या काही दिवसांपासून राहुलच्या मनात वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याची आग धगधगत होती. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास गोपाळ मालचे कुटुंबियांसोबत घरी परत येत होते. त्यावेळी राहुलने विहीर फाटा येथे त्यांच्या कारसमोर आपली बुलेट लावली. रस्त्यात उभी असलेली बुलेट गोपाळ मालचे गाडीतून खाली उतरले. त्यावेळी राहुलने गोपाळच्या कपाळाच्या मधोमध नेम धरून गोळी झाडली. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपी राहुल कोळी याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपीस धरणगाव न्यायालयाने सुनावली दोन दिवसाची पोलिस कोठडी…..

काल दिनांक २२/४/२०२५ रोजी पूर्व वैमनस्यातून तालुक्यातील विहीर फाट्या जवळ घडलेल्या थरारक खुणाच्या घटनेनंतर गोळीबार करणारा संशयितआरोपी राहुल कोळी रा. वाकटुकी यास धरणगाव पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर करून तपासाकामी पाच दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केलेली होती. सदर पोलीस कोठडी सुनावनी दरम्यान आरोपीतर्फे ॲड. गजानन पाटील यांनी बाजु मांडली व पोलीस कोठडीस जोरदार विरोध केला तसेच सरकारी वकील ॲड. सौ. चेतना कलाल यांनी सरकारतर्फे पोलीस कोठडीची मागणी केली सदर वेळेस गुन्ह्याचे तपास अधिकारी श्री वाघ श्री. वाघ यांनी देखील विविध मुद्द्यांवर पोलीस कोठडीची न्यायालयाकडे मागणी केली असता सुनावणीअंती न्यायाधीश श्री. अविनाश ढोके यांनी आरोपीस दोन दिवसाची म्हणजे दिनांक २५/४/२०२५ पावतो पोलीस कोठडीचे आदेश पारित केले. सदर सुनावणी वेळी परिसरातील लोकांची गर्दी देखील जमली होती.

मुख्य संपादक संजय चौधरी