एक भामटा पाहुणा बनून लग्नात आला नातेवाईक बनून रूबाबात फेटा बांधून मिरवायचा, अन् लग्नात ‘असा’ काही कांड केला की..

Spread the love

कोल्हापूर :- जिल्ह्यात कुणाचेही लग्न असो, एक पाहुणा हमखास येतोच! कोल्हापुरी फेटा बांधलेला, नातेवाईकासारखा वावरणारा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा, पण हा पाहुणा असतो अगदी वेगळाच. याच्या ‘विनम्र’ वावरामागे लपलेलं असतं एक धक्कादायक गुपित ते म्हणजे दागिने चोरीचं. कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेने अशाच एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. जो लग्नसमारंभांमध्ये नातेवाईक असल्यासारखा मिसळतो आणि महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारतो. बाळासो उर्फ अजित पाटील (वय अंदाजे 40, रहिवासी आदमापूर, कोल्हापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे.

शहरासह ग्रामीण भागात सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध मंगल कार्यालयांमधून सोन्याचे दागिने, रोकड असलेल्या पर्स आणि पिशव्या चोरीस जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा प्रकारांना आळा बसावा म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना विशेष सुचना दिल्या. या सूचनांनुसार निरीक्षक कळमकर यांनी तपासासाठी विशेष पथके तयार केली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. या तपासाअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी रेकॉर्डवरील संशयित आरोपी बाळासो उर्फ अजित पाटील याला आदमापूर येथून ताब्यात घेतले.

चार लाखांचे दागिने जप्त…..

प्राथमिक चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, अधिक चौकशी केल्यानंतर त्याने जय पॅलेस (कळंबा) आणि सृष्टी फार्म हाऊस (हणबरवाडी, कोल्हापूर) येथील मंगल कार्यालयांमधून चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण 3 लाख 78 हजार 470 रुपये किमतीचे, सुमारे 42 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या चोरट्याने फक्त कोल्हापूरच नाही, तर पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांतील लग्न समारंभांतूनही चोरी केली आहे. विशेष म्हणजे हा दागिने विकून टाकत नव्हता, तर स्टीलच्या डब्यात भरून ते जमिनीखाली पुरून ठेवायचा. अजित पाटील याची अधिक चौकशी केली असतात, त्याने 21 चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याचा अभिनय इतका सफाईदार होता की पोलिसही बुचकळ्यात पडले होते. पण अखेर कोल्हापूर पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले आहे. कोल्हापूर पोलिसांनी अजित पाटीलने जमिनीमध्ये पुरून ठेवलेले दागिने देखील शोधून काढले आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी