मोठी बातमी ! राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? गृहमंत्रीपदाची माळ यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता

Spread the love

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत मोठी माहिती समोर येतेय. महाविकास आघाडीतील नेते गृहविभागाच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा सुरु असून याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री पदावरुन दिलीप वळसे पाटील यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.

मात्र, गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहे. महत्वाची बाब म्हणजे विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गळ्यात गृहमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. 1 मे पूर्वीच हा फेरबदल होईल अशीही माहिती सूत्रांकडून मिळतेय. मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्र्यांवर छापेमारी सुरु आहे. दुसरीकडे महाराष्ट्र पोलीस किंबहुना गृहखातं भाजप नेत्यांविरोधात कठोर कारवाई करत नसल्याचा एक सूर महाविकास आघाडीतूनच उमटत होता. तेव्हापासून गृहखातं दुसऱ्या कुणाकडे दिलं जाणार याबाबत चर्चा सुरु होती.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गृहखात्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. गृहखात्याने अधिक सक्षम झालं पाहिजे. काल या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. तपास यंत्रणा राज्यात येऊन कारवाया करत आहेत हे गृहखात्यावर आक्रमण आहे. या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. आता गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल. नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा राऊत यांनी दिला होता. दुसरीकडे शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गृहखाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे घेण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही उदाहरण दिलं होतं

टीम झुंजार