हुबळी :- गेल्या काही काळापासून राज्यासह देशात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. आरोपीने मुलीला चॉकलेट देण्याचे आश्वासन देऊन तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.नंतर त्याने गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर नराधमाने तिचा मृतदेह एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवून दिला होता. याबाबत ५ वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार विजयनगर पोलिस स्थानकात दाखल झाली होती.
सीसीटीव्ही आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रितेश कुमार (वय-३५, मूळ रा. बिहार ) याला अटक केली होती. त्याच्याकडून अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस त्याच्या घरी घटनास्थळी घेऊन गेले होते. तेथे रितेश कुमार याने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी फौजदार अन्नपूर्णा यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळी झाडली.
पण तरीही रितेश कुमार पळून जात होता. त्यामुळे फौजदार अन्नपूर्णा यांनी त्याच्या पायावर आणि पाठीवर गोळ्या झाडल्या. जखमी झालेल्या रितेश कुमार याला उपचारासाठी किम्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेत एक पीएसआय आणि दोन कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशी कुमार म्हणाले, आम्ही रितेश कुमार या आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने आमच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्याने केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले. त्यावेळी पीएसआय अन्नपूर्णा यांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात रितेश कुमार मारला गेला. रितेश कुमार याच्या छाती आणि पायावर गोळी लागली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.