मित्रांबरोबर केलेली थट्टा-मस्करी जीवावर बेतली,10 हजाराच्या पैंजेसाठी 5 बाटल्या दारू पाणी न मिसळता पिण्याने २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.

Spread the love

कोलार (कर्नाटक) :- मित्रांबरोबर केलेली थट्टा-मस्करी जीवावर बेतू शकते, याची शेकडो उदाहरणे आपण पाहिली असतील. तरीही काही उत्साही तरूण यापासून धडा न घेता नको ते धाडस करून बसतात आणि जीव गमवतात.कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. २१ वर्षीय कार्तिकने मित्रांबरोबर लागलेल्या पैजेनंतर मद्याच्या पाच बाटल्या पाण्यात न मिसळताच रिचवल्या. जर पाच बाटल्या मद्य पाण्यात न मिसळता संपवल्या तर १० हजार रूपये देईन, असे मित्राने कार्तिकला सांगितले होते. या दहा हजारांसाठी कार्तिकला स्वतःचे प्राण गमवावे लागले.

नेमके काय झाले?

कार्तिक त्याच्या मित्रांबरोबर पार्टी करत होता. वेंकट रेड्डी, सुब्रमणी आणि इतर तिघे एकत्र बसलेले असताना वेंकट रेड्डीने कार्तिकशी १० हजारांची पैज लावली. कार्तिकने पाच बाटल्या मद्य रिचवले आणि त्यानंतर त्याची प्रकृती ढासळली. त्याला कोलारमधील मुलबगल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वर्षभरापूर्वी लग्न, आठदिवसांपूर्वीच बाळाचा जन्म

२१ वर्षीय कार्तिकचे एक वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. आठ दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने बाळाला जन्म दिला होता. मात्र मस्करीत लावलेल्या १० हजारांच्या पैजेमुळे कार्तिकला लाखमोलाचा जीव गमवावा लागला. पोलिसांनी कार्तिकच्या सहा मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर वेंकट रेड्डी आणि सुब्रमणी यांना अटक कली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

मद्याचे व्यसन हे जीवघेणे ठरू शकते, अशी सूचना देऊनही अनेक लोक व्यसनाच्या आहारी गेलेले दिसतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात वर्षाला जवळपास २६ लाख लोकांचा मृत्यू मद्याच्या व्यसनामुळे होतो. एकूण मृत्यूच्या आकडेवारीमध्ये ही संख्या ४.७ टक्के इतकी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, मद्य सेवनाची कोणतीही सुरक्षित पातळी नाही. तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार पाण्याशिवाय मोठ्या प्रमाणात मद्य पिणे हे आरोग्यास धोकादायक ठरू शकते. अतिरिक्त किंवा सुरक्षित पद्धतीने मद्य न घेतल्यास खालील धोके उद्भवू शकतात.

मद्यामुळे होणारी विषबाधा –

मद्याचे जलदगतीने सेवन केल्यास रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकते. ज्यामुळे श्वासोच्छवास, हृदयाची गती आणि शरीराचे तापमान स्थिर ठेवणे अशा महत्त्वाच्या कार्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.

निर्जलीकरण (Dehydration) –

मद्यामुळे शरीरातील द्रवपदार्थ कमी होतो. पाण्याशिवाय मद्य घेतल्यास तीव्र गतीने निर्जलीकरण होते. यामुळे मूत्रपिंड निकामी होण्यासारखे गंभीर आजार होऊ शकतात.

यकृतास अपाय –

यकृताद्वारे प्रति तास मर्यादित प्रमाणात मद्याचे चयापचय होते असते. जास्त प्रमाणात मद्य सेवन केल्यास त्याचा यकृतावर विपरित परिणाम होतो.

मुख्य संपादक संजय चौधरी