चारित्र्याच्या संशयावरून कात्रीने वार करून पत्नीची केली हत्या, आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर दोघं मुल झाली पोरकी.

Spread the love

अहिल्यानगर :- चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा कात्रीने वार करत निघृण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राणी सतीश खेडकर (वय- २९) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.मृत राणीचे वडील सुखदेव ढाकणे (रा. हसनापूर, ता. शेवगाव) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.

त्यानुसार आरोपी पती सतीश भास्कर खेडकर (वय- ३३) याला पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे शुक्रवारी (दि.९) पहाटे ही घटना घडली. खेडकर दाम्पत्याला ७ आणि ५ वर्षांची दोन मुले आहेत.

अधिक माहितीनुसार, आरोपी सतीश खेडकर याने चारित्र्याच्या संशयातून रागाच्या भरात पत्नीच्या पाठीत आणि गळ्यावर कात्रीने वार करत तिचा खून केल्याची घटना राहत्या घरी घडली. खून केल्यानंतर सतीश खेडकर स्वतः पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर होत त्याने हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये, शिवाजी तांबे व पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी