Viral Video :- एकमेकांच्या प्रेमात बुडालेली अनेक जोडपी अशी असतात, जी त्यांच्या पालकांना न सांगता बरेचदा बाहेर भेटतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? जर तुमच्या पालकांनी तुम्हाला या दरम्यान पकडले तर तुमचं काय होईल, त्याबद्दल विचार करणेही भयानक आहे. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे, जो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या…
एक मुलगा बाजारात त्याच्या प्रेयसीसोबत चाऊमीन खात होता. दरम्यान, मुलाचे पालक तेथून जात असताना त्यांचे लक्ष त्यांच्या मुलाकडे जाते. आपल्या मुलाला त्याच्या प्रेयसीसोबत पाहताच त्यांचा राग अनावर होतो आणि लगबगीने ते आपल्या मुलाकडे जाऊ लागतात. आपल्याकडे आई-वडील येत असल्याचे पाहताच मुलाला धक्काच बसतो. तो लगेच आपल्या प्रेयसीसोबत तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. दोघेही स्कूटरवर बसून पळून जाण्याचा प्रयत्न करतात, पण नंतर मुलाचे पालक त्यांना थांबवतात आणि मग काय, कसलाही विचार न करता मुलाचे आई-वडील रस्त्याच्या मधोमध सर्वांसमोर दोघांनाही बेदम मारहाण करू लागतात.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूरच्या गुजैनी भागातील राम गोपाल चौकातील आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा मुलगा २१ वर्षांचा आहे, तर त्याची प्रेयसी १९ वर्षांची आहे. शुक्रवारी एका २१ वर्षीय तरुणाला आणि त्याच्या १९ वर्षीय मैत्रिणीला तरुणाच्या पालकांनी सार्वजनिकरित्या मारहाण केली. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.स्थानिक पोलिसांनी या घटनेसंदर्भात सांगितले की, “रोहित नावाचा एक तरुण त्याच्या मैत्रिणीसोबत रस्त्यावर चाऊमीन खात होता. त्यानंतर त्याचे पालक शिवकरण आणि सुशीला तिथे पोहोचले. रोहितला मुलीसोबत पाहून ते संतापले. पालकांनी त्याचे नाते नाकारले आणि नंतर त्याला आणि त्याच्या मैत्रिणीला मारहाण करण्यास सुरुवात केली.”
मुलाची आई त्याला जोरात मारायला सुरुवात करते आणि मागे बसलेल्या मुलीला केस धरून ओढायला सुरुवात करते. त्याच वेळी मुलाचे वडील त्याला चपलेने मारताना दिसतात. लवकरच रस्त्यावर लोकांची गर्दी जमते आणि जवळ उभे असलेले लोक त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न करतात.रस्त्यावरच्या या तमाशाचा व्हिडीओ @liveankitknp नावाच्या एका माजी वापरकर्त्याने शेअर केला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले, त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून वेगळे केले.