चाळीसगाव :- पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. चाळीसगाव पोलीस स्टेशनमधील एका पोलिसाने खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता.भाजपचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी या प्रकरणात पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारीची मागणी केली होती. या प्रकरणात पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. समाजाचं रक्षण करणारेच भक्षक झाल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकरणात संशयित पोलीस कर्मचारी अजय पाटील याने एका व्यावसायिकाकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 1 लाख 20 हजार रुपये खंडणी वसूल केली होती. व्यावसायिकाने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनीही पोलीस स्टेशनमध्ये या खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची तडकाफडकी बदली केली आहे.
काय आहे प्रकरण?
भाजपचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी या प्रकरणाबद्दल ट्विट केलं आहे. ‘रक्षकच भक्षक झाले, खंडणी उकळणाऱ्या पोलिसांना अभय नाही…’ अशा आशयाचं आमदारांनी ट्विट केलं आहे. चाळीसगाव पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याने शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूट मालकाकडे ३ लाख रुपये द्या नाहीतर तुझ्यासह तुझ्या परिवाराला पॉस्कोच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये खंडणी उकळली होती. आमदार चव्हाण यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यांनी तत्काळ संबंधित तक्रारदार यांच्यासह शहर पोलीस स्टेशन गाठून चार तास ठिय्या दिला, यानंतर खंडणी उकळणारे संबंधित पोलीस कर्मचारी अजय पाटील व त्याचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचारी याच्या घरातून त्याने खंडणी घेतलेले 1 लाख 20 हजार रुपये देखील त्याच्या घराच्या झडतीत हस्तगत करण्यात आले.
आमदारांचे चाळीसगावातील नागरिकांना आवाहन..
ज्या पोलिसांनी नागरिकांना अपप्रवृत्ती पासून संरक्षण दिले पाहिजे तेच कायद्याचे रक्षक जर भक्षक होऊन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत खंडणी उकळत असतील तर ते कदापिही सहन केले जाणार नाही. या प्रकरणाच्या बाबतीत मी राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असून यात सहभागी सर्व पोलिसांची IPS दर्जाच्या अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणार आहे. मी माझ्या आमदारकीच्या पहिल्या दिवसांपासून अशा प्रवृत्तीच्या विरोधात असून मग तो कितीही मोठा व्यक्ती असो किंवा जवळचा असो त्याला योग्य ते शासन व्हावे व पीडित नागरिकांना न्याय मिळावा असा माझा प्रयत्न राहत आला आहे. माझी सर्व चाळीसगावकरांना विनंती आहे की, शासन प्रशासनातील कुणीही आपल्याला त्रास देत असेल, कुठेही पैशांची मागणी होत असेल, अडवणूक होत असेल, पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर आपण विनासंकोच माझ्याशी कधीही संपर्क साधा. मंगेश चव्हाण अशा नागरिकांच्या पाठीशी कायम उभा राहील याची ग्वाही मी देतो.