यावल :- तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुचाकीवर पती-पत्नी बाहेर जाण्यासाठी निघाले. गावाच्या बाहेर गेल्यानंतर विरावली गावाजवळ पत्नीने पतीला दुचाकी थांबवायला सांगितली आणि तिने जवळच असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. जळगाव जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. मात्र, पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी पतीनेच तिला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप केला आहे.
यावल तालुक्यातील महेलखेडी येथील मुस्कान अल्ताफ तडवी (वय २०) ही दुचाकीने पती अल्ताफ रहमान तडवी (रा. महेलखेडी) याच्यासोबत दुचाकीवर जात होती. दरम्यान, विरवली गावाजवळ शेत गट क्रमांक ५७ येथे तिने पतीला दुचाकी थांबवण्यास सांगितलं. दुचाकीवरून उतरून तिने विहिरीकडे धाव घेतली. त्यानंतर विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली. पती अल्ताफ तडवी यांनी आरडाओरडा केला, नागरिकांनी धाव घेत महिलेला विहिरीतून बाहेर काढलं. महिलेला वर काढल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अवघ्या २०व्या वर्षी विवाहित महिलेनं नेमकी आत्महत्या का केली असावी? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पतीने तिला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. या घटनेचा तपास डीवायएसपी कृष्णात पिंगळे आणि पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहेत.