नागपूर :- घरातील नोकरावर मोठा विश्वास ठेऊन घरमालक अनेकदा गावी जातात, फिरायला जातात. त्यातून, नोकर आणि घरमालक यांच्यातील स्नेह पाहायला मिळतो. मात्र, काहीवेळा नोकराकडूनच मालकाचा विश्वासघात करण्यात येतो, नोकराकडूनच मालकाची फसवणूक करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.आता, नागपूरमध्येही जरीपटका पोलीस ठाण्यातून अशी एक घटना समोर आली असून हिऱ्याची अंगठी चोरणाऱ्या नोकरानीला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. आपल्या प्रियकराला देण्यासाठी नोकरानीने मालकाच्या घरातील हिऱ्याची अंगठी चोरली होती. त्यानंतर, तिने आपल्या मूळ गावी पलायन केले. मात्र, कानून के हात बहुत लंबे होते है.. या उक्तीप्रमाणे पोलिसांनी पश्चिम बंगालमधील तिच्या मूळ गावी जाऊन आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मारिया सूर्यराव सुक्का असे या 30 वर्षीय महिलेचे नाव आहे. नागपूरतील जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत विनायक नगर येथे नुपूर अग्रवाल यांच्या घरी मारिया नोकरानी म्हणून काम करत होती. 18 मे रोजी अग्रवाल या घरी एकटाच होत्या,त्यावेळी त्यांनी ड्रेसिंग टेबलवर हातातील अंगठ्या काढून ठेवल्या होत्या. या संधीचं फायदा घेतल्या हिऱ्याच्या दोन्ही अंगठ्या मारियाने चोरून नेल्या. घरात अंगठ्या दिसत नाही हे लक्षात येताच आणि दुसरीकडे मारिया कामावर न आल्याचेही समजल्यानंतर अग्रवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मारियाने नुपूर यांच्याकडे 50 हजार रुपये मागितले होती. त्यानंतर, काही दिवसांतच 2 अंगठ्या गायब झाला असून मारिया देखील कामावर आली नव्हती. त्यामुळे, नुपूर यांनी या संदर्भात जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी, पोलिसांनी शोध घेतला असता मारिया ही पश्चिम बंगालमध्ये तिच्या मूळ गावी गेली असल्याची माहिती मिळाली होती.
प्रियकरासाठी चोरली अंगठी
पोलिसांनी पश्चिम बंगालला एक पथक पाठवत मरियाला अटक केली. तसेच, अटकेनंतर तिच्याकडे विचारपूस केली असता तिने हिऱ्याच्या अंगठ्या तिचा प्रेमी पवन भास्करला दिल्याची कबुली दिली. पवन भास्करा हा मूळचा नाशिकचा असून त्याचे मारियासोबत प्रेम प्रकरण होते. या प्रेमप्रकरणातून पवन तिच्याकडे पैसे मागत असल्यानं त्या दबावात तिने पैसे देण्यासाठी हिऱ्याची अंगठी चोरी केल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.