धरणगाव प्रतिनिधी:-(योगेश पाटील) संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने भारतात आता कुठे नांगी टाकलेली आढळून येत असली तरी त्यातून बरेचशे उद्योग,शासकीय-निमशासकीय,खाजगी प्रकल्प प्रभावित झाल्याचे व त्यातून वाढलेली बेरोजगारी तथा महागाई ने सर्वत्र जनता होरपळून निघालेली दिसून येत आहे.
त्यातच महत्वाचा मुद्दा म्हणजे बालकामगार. बालकामगार हा विषय अतिशय संवेदनशील असून याकडे सवेदनात्मक रित्याच पाहिले पाहिजे परंतु गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू असलेला राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प विभागातील केंद्रे ही बंद अवस्थेत आहेत.त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात बालकामगार यांची संख्या झपाट्याने वाढत असून याला जबाबदार कोण..?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प हा समग्र शिक्षा अभियान अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला असून,यामध्ये बालकांचा ही समावेश करण्यात आलेला आहे.परंतु ज्या बालकांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्यांनी दिवस रात्र मेहनत करून 14 ते 15 वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम केले त्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीला संबंधित कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे .
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील कर्मचारी यांनी वेळोवेळी विविध आमदार खासदार मंत्री यांना राष्ट्रीय बालकामगार शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी संघटने तर्फे निवेदने देऊन आपली व्यथा सविस्तर पणे मांडलेली असून देखील आजतागायत पाहिजे
तशी दखल घेण्यात आलेली नाही. असे कर्मचाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे तरी यावर शासनाने ठोस निर्णय घेऊन ज्याप्रमाणे प्रकल्पास व बालकामगारांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे त्याच प्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समाविष्ट करून घेण्यात यावे ही सर्वत्र मागणी होत असून येणाऱ्या काळात लवकरात लवकर प्रकल्प कार्यान्वित करावा ही कळकळीची मागणी कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.