श्रीक्षेत्र पद्मालयाच्या विकासासाठी कटिबद्ध: आमदार अमोलदादा पाटील; २३ कोटींच्या विकासकामांची पाहणी

Spread the love


एरंडोल | प्रतिनिधी :- श्रीक्षेत्र पद्मालय हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून येथील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन आमदार अमोल पाटील यांनी केले. आगामी काळात संपूर्ण पद्मालयचा विकासकामांच्या माध्यमातून कायापालट करून या देवस्थानाला सुंदर पर्यटनस्थळ बनवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही ते श्रीक्षेत्र पद्मालयाच्या सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या पाहणीप्रसंगी बोलताना म्हणाले.

२३ कोटींच्या विकासकामांना गती

धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तसेच तालुक्याची देशभरात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्रीक्षेत्र पद्मालय (ता. एरंडोल) येथे सुमारे २३ कोटी रुपये खर्चून सुरू असलेल्या विविध विकासकामांची आमदार अमोल पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. विकासकामांबाबत कोणतीही तडजोड न करता, सर्व कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार अमोल पाटील यांनी ठेकेदारांना दिल्या.

भाविकांची नाराजी दूर करण्यासाठी निधी उपलब्ध

श्रीक्षेत्र पद्मालय विकासापासून वंचित असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. मंदिर परिसरात सर्वत्र घनदाट जंगल असल्यामुळे भाविकांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अमोल पाटील यांनी निधी उपलब्ध व्हावा यासाठी शासनाच्या वनविभाग आणि पर्यटन विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे श्रीक्षेत्र पद्मालय येथील विविध विकासकामांसाठी वनविभागातर्फे वनपर्यटन अंतर्गत सुमारे दहा कोटी रुपये, तर पर्यटन विभागातर्फे तेरा कोटी रुपये, असा एकूण सुमारे तेवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे.

गणराया उद्यान आणि अन्य सुविधा

मंजूर झालेल्या निधी अंतर्गत सुमारे दहा एकर क्षेत्रावर गणराया उद्यानाची निर्मिती करण्यात येणार असून, अडीच एकर क्षेत्रावरील विविध उद्यानांच्या कामांना सुरुवात झाली आहे. ही सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. तसेच, मंदिराच्या समोरील बाजूस पर्यटन विभागातर्फे मंजूर झालेल्या सुमारे तेरा कोटी रुपयांच्या निधीतून स्वच्छतागृह, सभागृह, रस्त्यावर पेव्हर ब्लॉक यासह विविध कामे वेगाने सुरू आहेत. आमदार अमोल पाटील यांनी पद्मालयातील सुरू असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता, सर्व कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना केल्या. यावेळी त्यांनी वनविभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून सुरू असलेल्या सर्व कामांची माहिती जाणून घेतली.

पद्मालयाचे धार्मिक आणि नैसर्गिक महत्त्व

पद्मालय येथे सुरू असलेल्या विविध विकासकांमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून, भाविकांना विविध प्रकारच्या सोयी आणि सुविधा उपलब्ध होणार आहेत. या विकासकामांमुळे भाविकांच्या संख्येत वाढ होणार असून, त्यांना देवदर्शनासह पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. श्रीक्षेत्र पद्मालय येथे डाव्या आणि उजव्या सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी असून, मंदिराचे बांधकाम पूर्णपणे हेमाडपंथी आहे.

मंदिरासमोरच असलेल्या तलावातील विविध रंगाची कमळाची फुले भाविकांना आकर्षित करतात. तसेच, मंदिराच्या चारही बाजूस घनदाट अरण्य असून, याठिकाणी जंगली जनावरांची संख्या लक्षणीय आहे. मंदिर परिसरातच मोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडत असते.

माजी आमदार चिमणराव पाटील आणि आमदार अमोल पाटील यांनी भाविकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून पद्मालय येथील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणल्याबद्दल भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी