बहिणीच्या दिराशी पळून जात केलं लग्न, सासरच्यांकडून मुलगी झाली म्हणून शारीरिक मानसिक छळाला कंटाळून ३ वर्षाच्या चिमुकलीला सोडून गर्भवती आईने दिला जीव.

Spread the love

सोलापूर :- राज्यभरात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु असतानाच, सोलापूरमधूनही एक संतापजनक हुंडाबळीची घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथे राहणाऱ्या आशाराणी पवन भोसले (वय २२) या विवाहितेने सासरच्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणात पती पवन भोसले, सासू अलका भोसले आणि सासरे बलभीम भोसले यांच्याविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

प्रेमविवाह, पण पुढे सुरु झाला छळ

आशाराणी हिचा विवाह तिच्या मोठ्या बहिणीच्या दीराशी म्हणजेच पवन भोसले याच्याशी २०१९ साली प्रेमविवाहाद्वारे झाला होता. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना वैष्णवी नावाची चिमुकली मुलगी झाली. मात्र, त्यानंतरच आशाराणीचा छळ सुरू झाला. चारचाकी वाहन आणि पैशाच्या मागणीसाठी नवऱ्याने सतत मारहाण केली, तसेच सासू-सासऱ्यांनीही ‘स्वयंपाक येत नाही’, ‘सासरच्या माणसांची इज्जत करत नाही’ असे म्हणत मानसिक त्रास दिला.

मुलाला इज्जत का देत नाही म्हणत त्रास…

आशाराणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले यांनी देखील तिला स्वयंपाक नीट करता येत नाही आणि मुलाला (पवनला) इज्जत देत नाही, अशा टोमण्यांनी मानसिक त्रास दिला. या सततच्या छळाला कंटाळून आशाराणीने 3 जून 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने चिंचोलीकाटी गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

माहेरी तक्रार, पण पुन्हा सासरी पाठवले

२०२४ मध्ये सततच्या मारहाणीला कंटाळून आशाराणी माहेरी रायचूर येथे आली होती. त्यावेळी पतीने तिच्यावर नांदायला येत नसल्याची तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसांनी समुपदेशन करत दोघांची समजूत काढली आणि आशाराणी पुन्हा सासरी परत गेली. मात्र वर्षभराच्या आतच, मंगळवारी (३ जून २०२५) तिने गळफास लावून आयुष्य संपवले.

दुसऱ्यांदा गरोदर, तरीही थांबला नाही छळ

मुलगी वैष्णवी केवळ तीन वर्षांची असून आशाराणी दुसऱ्यांदा गरोदर होती. तरीही तिच्यावर मानसिक व शारीरिक छळ सुरूच होता. वडील नागराज डोणे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, पती पवनने तिला सतत पैसे आणण्यास भाग पाडले, व्हिडिओ कॉलवर मारहाण केली, तर सासू-सासरेही तिला कमी लेखायचे.यासंदर्भात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पती पवन भोसले, सासू अलका भोसले आणि सासरे बलभीम भोसले या तिघांनाही अटक केली आहे. त्यांच्या विरोधात BNS कलम 80(2), 115(2), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महिलांवरील वाढते अत्याचार ही समाजासाठी गंभीर बाब

ही घटना म्हणजे फक्त आशाराणीच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक महिलांच्या रोजच्या संघर्षाचं एक उदाहरण आहे. हुंडा बंदी कायदा असूनही अजूनही समाजात हुंड्यासाठी होणारा छळ, अत्याचार आणि आत्महत्या थांबत नाहीत. फक्त कायद्यानं नाही, तर समाजानंही बदल व्हायला हवा, ही वेळ आहे की आपण जागरूक होऊन या प्रश्नावर एकजूटीनं आवाज उठवण्याची!

मुख्य संपादक संजय चौधरी