स्थानिक गुन्हे शाखेने दोघं आरोपींना ३६ तासाच्या आत केली अटक, एक संशयित आरोपी फरार एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील घटना.
एरंडोल :- तालुक्यातील रिंगणगाव येथे काल झालेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाचा खून झाला होता.या प्रकरणातील दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून एक संशयित फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी दिली.किरकोळ कारणावरून चौदा वर्षीय बालकाची हत्या करण्यात आली असून दोन्ही संशयितांना आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दिनांक २३:६ २०२५ पर्यंत (पाच दिवस) पोलीस कस्टडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश श्रीमती बी.ए.तळेकर यांनी दिला.
सविस्तर माहिती अशी,की रिंगणगाव येथील तेजस गजानन महाजन या चौदा वर्षीय मुलाचा निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह काटेरी झुडूपाखाली फेकण्यात आला होता.मृत तेजस व संशयित हरदास वासकले व सुरेश खरते व अन्य संशयितांचा धक्का चौदा वर्षीय तेजस यांना पायी चालत असतांना धक्का लागला होता.त्यावरून तेजस व संशयितांमध्ये वाद झाल्यामुळे तिघाही संशयितांनी केलेल्या मारहाणीत तो बेशुद्ध पडला.संशयितांनी बेशुद्ध पडलेल्या तेजसला उचलून घराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत रिचडिया काटोले याने तिष्ण हत्याराने त्याच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या केली व मृतदेह काटेरी झुडूपाखाली फेकून फरार झाले होते.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळी भेट देवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संदीप पाटील,एरंडोलचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व एरंडोल पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी गावात सखोलपणे चौकशी केली होती.तेजसचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला तेथून केवळ पन्नास फुट अंतरावर राहणारा संशयित हा पत्नी मुलासह विवाह समारंभासाठी तर दुसरा संशयित कामानिमित्त घटनेच्या दिवशीच मोटारसायकलवरून परगावी निघून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित फैजपूर-रावेर मार्गे मध्यप्रदेशात जात असल्याची माहिती मिळाली.
फैजपूर पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम याकूब, हरिलाल पाटील, विजय पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील, विष्णू बिहाडे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, राहुल कोळी, किशोर पाटील, पो हे कॉ प्रदीप चवरे, निलेश सोनवणे, सुरेश खतरे यांच्या पथकाने हरदास वासकले यास ताब्यात घेतले.तर दुस-या संशयितास मध्यप्रदेशात सुमारे दहा किलोमीटर पायी पाठलाग करून अटक केली.तर त्यांचा तिसरा सहकारी रीचडीया काटोले हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या दोन्ही संशयितांना एरंडोल पोलीसस्टेशनच्या ताब्यात दिले असून दोन्ही संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.स्थानिक गुन्हा शाखा व एरंडोल पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांनी केवळ ३६ तासाच्या आत खुनातील संशयितांना अटक केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.चौदा वर्षीय मुलाचा किरकोळ कारणावरून खून झाला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी केले आहे.