झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-हळदीच्या कार्यक्रमासाठी आई,वडिल व भावासह गेलेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस विखरण शिवारातील शेतातून फूस लावुन पळवून नेल्याची घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास घडली.याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी,की शहरातील अनेक शेतांमध्ये मेंढपाळ कुटुंब रहिवासासाठी आले आहेत.असेच एक मेंढीपालन करणारे मेंढपाळ कुटुंब शेतात राहून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवता.विखरण (ता.एरंडोल) येथील तुकाराम भिला यांच्या शेतात मेंढपाळाच्या शालकाच्या मुलीचे लग्न असल्यामुळे सर्व परिवार हळदीच्या कार्यक्रमासाठी विखरण येथे आले होते.
मध्यरात्री उशिरापर्यंत हळदीचा कार्यक्रम चालल्यानंतर परिवारातील सर्व सदस्य शेतातच झोपले होते.पहाटेच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या वडिलांना जाग आली असता त्यांची तेरा वर्षीय मुलगी आढळून आली नाही.आई,वडील,भाऊ व नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला असता ती आढळून आली नाही.अज्ञात व्यक्तीने तिला फूस लाऊन पळवून नेल्याचा संशय वडिलांना आहे.अल्पवयीन मुलगी रंगाने गोरी असून,शरीराने सडपातळ,केस लांब,उंची पाच फुट असून तिने तपकिरी रंगाची जीन्स व तपकिरी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे.याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.