जळगाव :- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीका स्नेहलता अनंत चुंबळे (वय ६०) यांचा खून झाल्याची घटना गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात घडली होती. दरम्यान आरोपींकडून ३० लाखांची रक्कम पोलिसांनी जप्त केली असून ही रक्कम मृत महिलेच्या नातेवाईकांना दिली.यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डीवायएसपी संदीप गावित हे उपस्थित होते.
नाशिक येथील रहिवाशी असलेल्या सेवानिवृत्त परिचारीका स्नेहलता चुंबळे यांची २० ऑगस्ट २०२४ रोजी पैशाच्या लालसेपोटी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत संशयित आरोपी जिजाबराव अभिमन्यू पाटील (वय ४८, रा. अमळनेर, मूळ रा. खडकीसिम, ता. चाळीसगाव) आणि विजय रंगराव निकम (वय ४६, रा. अमळनेर, मूळ रा. विचखेडा, ता. पारोळा) या दोघांना अटक केली.
हे दोन्ही आरोपी जळगाव येथील जिल्हा परिषदमध्ये लिपीक पदावर नेमणुकीला होते. ओळखीतून त्यांनी महिलेला गोड बोलून कारमधून नेले होते. त्यानंतर तिची हत्या करून तिच्याकडील ३० लाखाची रक्कम घेऊन पसार झाले होते. ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली असून जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार ही रक्कम नातेवाईक संजय नानासाहेब देशमुख व समीर उर्फ सौरभ संजय देशमुख यांना सुपुर्त करण्यात आली.