भडगाव प्रतिनिधी :–
भडगाव तालुक्यातील वाक येथील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसाचा मोठ्या प्रमाणावर प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री गिरणा नदीपात्रात बाहेर जिल्ह्यातील एक १२-टायरी टाटा कंपनीची ट्रक वाळूमध्ये फसली होती. या संदर्भात स्थानिक गावकऱ्यांनी तत्काळ महसूल विभागाला माहिती दिली.
सूचना मिळताच महसूल विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन जेसीबीच्या सहाय्याने सदर ट्रक नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली आणि ती भडगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आली.
ही कारवाई तहसीलदार शीतल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ग्राम महसूल अधिकारी मोहम्मद जब्बार खाटीक (वाक), प्रशांत कुंभारे (टोणगाव), समाधान हुल्लुळे (कोठळी), महसूल सेवक विशाल सूर्यवंशी, किरण मोरे (टोणगाव), पोलीस नाईक मनोहर पाटील, पो.कॉ. महेंद्र चव्हाण आदींनी संयुक्तरित्या ही कारवाई पार पाडली.
महसूल विभागाकडून या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर लवकरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.