रायगड:- रस्त्याने चालत जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अन्यथा तुला मी ठार मारेन, अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किहीम येथे ही भयंकर घटना घडली.याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, याबाबत पोलिसांनी आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याबाबत मांडवा सागरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास किहीम आरसीएफ कॉलनी समोरून जात होती. तेवढ्यात आरोपी आपल्या काळ्या रंगाच्या दुचाकीने आला त्याने महिलेला अडवत माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, असं म्हणत त्यांची छेड काढली. शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुला जीवे ठार मारेन अशी धमकीही त्याने दिली. यावर महिलेने आरोपीला मी तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवणार नाही, असे सांगितले. तेव्हा आरोपीने तिथून आपल्या दुचाकी वरून पळ काढला.महिलेने मांडवा सागरी पोलीस ठाणे गाठत याची तक्रार दिली असता पोलिसांनी तात्काळ घटनेची नोंद करत 24 तासाच्या आत आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मांडवा सागरी पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.