एरंडोल :- महिला बचत गटातील सदस्यांचे कर्जाची सुमारे साडेचार लाख रुपयांची रक्कम बँकेतून काढून घराकडे जात असलेल्या बचत गटाच्या अध्यक्षांच्या हातातील पैशांची थैली मोटारसायकलवर आलेल्या दोन जणांनी हिसकावून लुट नेल्याची घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास पांडववाडा परिसरातील महाजन
कलेक्शन समोर घडली.पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून लुटारूंचा तपास सुरु केला आहे.भर दुपारी रहदारीच्या रस्त्यावर लुट झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत माहिती अशी,की खडकेसीम (त.एरंडोल) येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश मिस्तरी व सचिव संगिता पाटील ह्या आज दुपारी बचतगटाचे मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम सुमारे साडेचार
लाख रुपये काढण्यासाठी स्टेट बँकेत आल्या होत्या.
दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी बँकेतून रक्कम काढून पिशवीत ठेवली.चार वाजेच्या सुमारास अध्यक्षा जयश्री मिस्तरी व सचिव संगिता पाटील ह्या बँकेतून घरी खडकेसीम येथे जाण्यासाठी पांडववाडा परिसरातून कासोदा नाका येतील बसथांब्याकडे पायी जात होत्या.त्याचवेळी महाजन कलेक्शनजवळ महिला पदाधिकारी असतांना अचानक मोटारसायकलवर आलेल्या दोन जणांनी अध्यक्षा जयश्री मिस्तरी यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून पळ काढला.महिला पदाधिका-यांनी आरडाओरड मोटारसायकलस्वारांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे भरधाव वेगाने मोटार सायकल चालवून पसार झाले.
महिलांचा आवाज एकूण परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून झालेल्या घटनेची माहिती जाणून घेतली.मोटारसायकलवरील लुटारू ब्राम्हण ओटा,खोल महादेव मंदिर,अंमळनेर दरवाजा मार्गाने भरधाव वेगात बसस्थानकाच्या दिशेने निघून गेले.स्टेट बँकेतून कर्जाचिओ रक्कम घेवून जाणा-या बचत गटाच्या पदाधिका-यांची लुट झाल्याचे समजताच पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्या दिशेने तपास सुरु केला आहे.मोटार सायकलवरील लुटारूंनी पाळत ठेवून लुट केल्याचे बोलले जात आहे.दरम्यान भर दुपारी साडेचार लाख रुपयांची लुट करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.महिलांच्या लुट प्रकरणातील संशयितांचा शोध घेवून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी व्यक्त केला.