सावदा (प्रतिनिधी) – सावदा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील मंगलवाडी परिसरात असलेल्या जॅकवेलवर आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास देखभाल व दुरुस्तीच्या कामादरम्यान एक गंभीर अपघात घडला. या घटनेत दोन रोजंदारी कामगारांना विद्युत शॉक लागून ते गंभीररित्या जखमी झाले असून, या दुर्घटनेने पाणीपुरवठा योजनेतील सुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
जॅकवेलवर नेहमीप्रमाणे देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने पृथ्वी चंद्रकांत भंगाळे आणि पंकज देविदास बेंडाळे या दोन्ही रोजंदारी कर्मचाऱ्यांना जोरदार विद्युत शॉक बसला. या शॉकमुळे ते जागेवरच बेशुद्ध होऊन पडले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना सावदा येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून, सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असली तरी पुढील काही तास अत्यंत नाजूक मानले जात आहेत.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघात नेमका कशामुळे झाला? जॅकवेलमध्ये काम करताना आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? या महत्त्वाच्या बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि कामगार संघटनांकडून केली जात आहे. काही प्रत्यक्षदर्शीच्या मते, घटनास्थळी पुरेशा सुरक्षा साधनांची कमतरता होती आणि इलेक्ट्रिक सप्लाय पूर्णतः बंद न करताच काम सुरू करण्यात आलं, ही मोठी निष्काळजीपणाची बाब आहे.
नगरपालिका प्रशासनाने मात्र जखमी कर्मचाऱ्यांच्य उपचारांसाठी तातडीने मदत पुरवली असून, वैद्यकीय खर्चाची जबाबदारीही घेतली आहे. तरीही, या घटनेने पाणीपुरवठा योजनेतील सुरक्षेच्या नियमांचं गांभीर्य आणि त्यातील त्रुटी पुन्हा एकदा उजेडात आल्या आहेत. रोजंदारी कर्मचाऱ्यांना कमी पगारात जास्त जोखीम असलेलं काम करावं लागतं, हे वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. मात्र सदर घटना नगर पालिका प्रशासन यांचे कार्यपद्धतीवर नक्कीच प्रश्न चिन्ह निर्माण करणारी आहे तर समबंधीत ठेकेदार यांनी या कर्मचाऱ्यांनचे विमे काढणे आवश्यक असतांना ते काढले नाहीत याची देखील चौकशी होणे आवश्यक आहे