एरंडोल तालुक्यातील पातरखेडा आश्रम शाळेतील ४६ विद्यार्थ्यांना गोवर ची लागण…

Spread the love

एरंडोल :-तालुक्यातील पातरखेडा येथील खाजगी आश्रम शाळेतील ४६ विद्यार्थ्यांना गोवर ची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी २४ जुलै २०२५ रोजी पातरखेडा येथील ४६ विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला व अंगावर पुरळ, डोकेदुखी जाणवत असल्याने त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ३२ विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना जळगाव येथे पाठविण्यात आले तर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात १४ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. गोवर हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे आरोग्य विभाग खळबळून जागा झाला आहे. विशेष हे की तब्बल ४६ विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाले आहे.
एरंडोल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मुकेश चौधरी डॉक्टर संदीप गांगुर्डे डॉक्टर संकेत पाटील डॉक्टर वानखेडे डॉक्टर खंबायत यांनी गोवर झालेल्या मुलांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. सौम्य लक्षणे असलेल्या मुलांवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून गोवरच्या आजाराची तीव्रता असलेल्या रुग्ण मुलांना जळगावला पाठविण्यात आले आहे.
दरम्यान या आजाराची लागण झाल्याचे आश्रम शाळा प्रशासनाचे वेळीच लक्षात कसे आले नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळे एवढ्या मोठ्या संख्येने गोवर या आजाराचा संसर्ग वाढला. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेबद्दल वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जनमानसातून होत आहे.
घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे गरिबांची मुले लांब अंतरावरून आश्रम शाळेमध्ये शिकण्यासाठी येतात आणि अशा मुलांच्या आरोग्याची काळजी वेळीच घेणे आवश्यक आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी