एरंडोल :- कढोली (ता.एरंडोल) परिसरातील कांताई बंधारा परिसरात तहसीलदार प्रदीप पाटील व महसूल पथकातील कर्मचा-यांनी वाळूमाफियांविरोधात धडक कारवाई करून दोन डंपर जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले तर अंधाराचा फायदा घेवून तीन डंपर चालकांनी पलायन केले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रांताधिकारी मनीषकुमार
गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रदीप पाटील यांनी वाळूचोरी विरोधात केलेल्या धडक कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
कढोली येथील कांताई बंधारा परिसरात गिरणा नदीच्या पात्रातून वाळूची मोठ्या प्रमाणावर चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात होती.गिरणानदीच्या पात्रातून वाळूचा अवैधरीत्या उपसा केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती.प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रदीप पाटील यांचेसह पथकातील सदस्य नायब तहसीलदार किशोर माळी, निवासी नायब तहसीलदार संजय घुले,मंडळअधिकारी भरत पारधी,ग्राम महसूल अधिकारी राहुल अहिरे,मनोज सोनवणे,संदीप ढोले,अमर भिंगारे,सुदर्शन पवार,ग्राममहसूल सेवक जितेंद्र बडगुजर यांनी शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बंधारा परिसरात अचानक भेट दिली असता त्यांना पाच डंपरमध्ये वाळूचा भरणा केला जात असल्याचे आढळून आले.
महसूल पथकाने पाचही डंपरवर कारवाई केली त्यामध्ये दोन डंपर जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले तर अंधाराचा फायदा घेवून तीन चालक डंपरसह फरार झाले.मात्र फारात झालेल्या डंपरचे क्रमांक पथकाकडे असल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाळू माफियांना तहसीलदार यांचेसह महसूल पथक आल्याची माहिती मिळताच अनेक वाळूमाफिया वाहनांसह पसार झाले.दरम्यान कांताई बंधारा परिसरासह दापोरी,रवंजा,टाकरखेडे यासह गिरणा नदी पात्रालगत असलेल्या गावातून दररोज रात्री सुमारे पन्नास ते साठ डंपरद्वारे वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्यामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
याशिवाय वाळूमाफिया वाळूची चोरी करून वाहन वेगाने चालवत असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. बंधारा परिसरात वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत.वाळूमाफिया tractorला विशिष्ट प्रकारची मशिनरी लावली असून त्याच्या माध्यमातून नदीपात्रात पाणी असतांना देखील वाळू उपसा करण्यात येतो.यापूर्वी देखील महसूल पथकाने वाळू माफियांविरोधात अनेकवेळा कारवाई करून देखील वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रदीप पाटील व महसूल कर्मचा-यांनी
वाळूमाफियांविरोधात केलेल्या कारवाईचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
वाळूमाफियांविरोधात कारवाई यापुढेही सुरूच राहणार-प्रदीप पाटील,तहसीलदार एरंडोल.
तालुक्यात वाळूची चोरी रोखण्यासाठी महसूल पथकातील कर्मचारी कायम गस्त घालत आहेत.यापुढेही वाळूमाफियांविरोधातील कारवाई सुरूच राहणार आहे.वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयास द्यावी.