जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम

Spread the love

जामनेर (प्रतिनिधी):- जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज ९ ऑगस्ट रोजी मौजे गंगापुरी येथील शासकीय आदिवासी मुलांची शाळा येथे एक आगळावेगळा उपक्रम पार पडला. आदिवासी बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन जागरूकता निर्माण करण्यात आली.
या प्रसंगी धरती आबा योजना, जातीचे दाखले, विशेष सहाय्य योजना आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन तहसीलदार जामनेर श्री. नानासाहेब आगळे यांनी केले. उपस्थितांना योजनांचा लाभ कसा मिळवायचा याबाबतही त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली.
कार्यक्रमानिमित्त “एक पेड माँ के नाम” या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत आश्रमशाळा परिसरात वृक्षारोपण करून हरित संदेश देण्यात आला.
यावेळी सरपंच गारखेडा बु, उपसरपंच, स्थानिक पदाधिकारी, आदिवासी बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शासकीय आश्रमशाळा गंगापुरीचे मुख्याध्यापक तायडे व शिक्षकवृंद यांनी केले.

जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने झालेल्या या उपक्रमामुळे बंधुतेचे बंध जुळले, योजना जनतेच्या दारी पोहोचल्या आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेशही रुजला.

मुख्य संपादक संजय चौधरी