जळगावातील खळबळ घटना, कुटुंब रडत रडत म्हणतंय, किमान तिची……

जळगाव :- आजवर आपण पैसे, दागिने, वाहन, मोबाईल चोरीला गेल्याचे ऐकलं असेल. पण जळगाव शहराच्या मेहरून स्मशानभूमीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय.स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी एका वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कार उघडकीस येताच कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कुटुंबीयांकडून अस्थी परत करण्याची भावनिक मागणी केली आहे. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
जळगाव जिल्ह्यातील गायत्री नगर येथील छबाबाई काशिनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आले होते. मयत छबाबाई पाटील यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यात आले नव्हते.
दुर्दैवाने याच गोष्टीचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्रीच स्मशानभूमीतून पाटील आजी यांच्या अस्थीतील डोक्याचा, हाताचा आणि पायाचा भाग चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून, पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आमदार सुरेश भोळेंची सीसीटीव्हीची मागणी
या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून, पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेवरून आमदार सुरेश भोळे यांनीही महापालिकेवर ताशेरे ओढले असून, मेलेल्या नागरिकांचीही अस्थी सुरक्षित नाही, ही लाजिरवाणी बाब असल्याचे मत व्यक्त केले आहे. आमदार भोळे म्हणाले की, ‘या घटनेमुळे पाटील कुटुंबाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. काही कावळ्यांनी अंगावरून सोनं काढून नेले आहे. आमची महापालिकेला विनंती आहे की, अशी घटना घडू नये यासाठी या ठिकाणी लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉचमनची सोय करावी.’
महिलेचा मुलगा काय म्हणाला?
मयत महिलेचा मुलगा आर के पाटील यांनी म्हटले की, ‘आमच्या आईचे निधन झाले, काल तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक परंपरेसाठी आम्ही अस्थी नेण्यासाठी आलो होतो, मात्र अस्थी सुरक्षित नव्हत्या. डोक्याच्या, हाताच्या आणि पायाच्या अस्थी चोरीला गेल्या होत्या. याबाबत आम्ही प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे. अस्थी परत मिळाव्या म्हणून आम्ही पोलीस तक्रारही देणार आहोत. मी महापालिकेला एक विनती करतो की, अशा अस्थी चोरी होऊ नये म्हणून या ठिकाणी सुरक्षा भिंत बांधण्यात यावी, सुरक्षा रक्षक देण्यात यावा आणि 24 तासांच्या आत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावा.’
