
नवी दिल्ली – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून आता 4 मे रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील महापालिका निवडणूक लांबणीवर पडणार आहेत.
ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निवडणुकांच्या तारखा प्रभाग रचना करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यासाठी 13 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर आता 4 मे रोजी चित्र स्पष्ट होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर निवडणुकांचे अधिकार राज्याने विशेष कायदा पारित करत स्वतःकडे घेतले आणि त्यानंतर राज्यातील 18 पालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत.
राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवर आज एकत्रित सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी टळली आहे.