मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असलयाने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील टास्क फोर्सच्या सदस्यांची विशेष बैठक नुकतीच पार पडली. यात जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची सौम्य लाट येण्याची शक्यता वर्तवत पुन्हा मास्क सक्ती करावी अशा मागणीचा प्रस्ताव टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे.
या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर टास्क फोर्सच्या सदस्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यात आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा एक प्रस्ताव सादर केला. तसेच बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याची सक्त्ती करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी केली आहे
टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या प्रस्तावाद्वारे अनेक सल्ले दिले आहेत. त्यामध्ये राज्यात सध्या कोरोनाच्या चाचण्या कमी होत आहेत. त्यामुळे या कोरोना चाचण्याची संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा. सध्या संसर्ग झालेली व्यक्ती ही रॅपिड टेस्ट करून स्वतःला घरातच विलग करत आहे. अनेकजण आरटीपीसीआर करणे टाळत असून त्या चाचण्यांवर भर देण्याची गरज असल्याचे टास्क फोर्सने सांगितले आहे.