
नाशिक : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यावरून भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊतांसह शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. ते खुर्चीसाठी हिंदुत्वाची आहुती देतील. किरीट सोमय्यांची जखम केवढी होती हा विषय नाही. मात्र, ज्या पद्धतीने हल्ला झाला, त्यामुळे इजा झाली. संजय राऊत म्हणतात टोमॅटो सॉस होता. त्यांनी काय चव घेतली होती काय, असा सवाल गिरीश महाजन यांनी केला.
संजय राऊत यांच्या कुठल्या प्रश्नाला उत्तर द्यावे हे कळत नाही. सकाळ, संध्याकाळ त्यांचा भोंगा सुरू असतो. त्यांच्या म्हणण्याला लोक देखील कंटाळले आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावा की नाही, हा आढावा राज्यपाल घेतील. पण राज्यातील आजची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
सरकारला पूर्ण वेळ राजकारण करायचे आहे. राज ठाकरे यांच्या मागणीमुळे सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांची सभा होऊ नये, असा सरकार प्रयत्न करत आहे. शिवसेनेच्या सगळ्याच भूमिका बदलल्या आहेत. बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती. ही सत्तेसाठी लाचार शिवसेना असून, खुर्चीसाठी हिंदुत्वाची आहुती द्यायला तयार आहे.